सुनीत पोतनीस

रोनाल्ड रॉस हे ब्रिटिश डॉक्टर. त्यांनी त्यांच्या भारतातील वास्तव्यात मलेरिया या आजारावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे ते ओळखले जातात. या कामगिरीसाठी त्यांना १९०२ सालच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानितही करण्यात आले. एका विशिष्ट जातींच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होऊन डासांमुळेच हा आजार फैलावतो असा निष्कर्ष रोनाल्ड यांनी काढला. वैद्यकीय क्षेत्राशिवाय त्यांना अनेक विषयांत स्वारस्य होते. ते उत्तम गणितज्ञ, उत्तम लेखक, उत्तम कवी होते. त्यांच्या काही कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.

रोनाल्ड यांचा जन्म अल्मोडा या सध्याच्या उत्तराखंड प्रांतात असलेल्या ठिकाणी १८५७ साली झाला. त्यांचे वडील कॅम्पबेल ले ग्रँट रॉस हे ब्रिटिश भारतीय लष्करात जनरल या उच्च पदावर होते. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या धामधुमीत अनेक इंग्लिश अधिकारी आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबासह मदानी प्रदेशातून कुमाऊँ पर्वतरांगांच्या परिसरात जाऊन राहू लागले. रोनाल्डचे वडील कॅम्पबेल आपली पत्नी शार्लोटसह त्या पर्वतीय प्रदेशात जात असताना अल्मोडा येथे पोहोचले आणि तिथे पत्नी शार्लोट प्रसूत होऊन रोनाल्डचा जन्म झाला. रोनाल्ड हे आपल्या दहा भावंडांत सर्वात ज्येष्ठ.

भारतातील परिस्थितीचा विचार करून कॅम्पबेल यांनी रोनाल्डला त्याच्या आठव्या वर्षी त्याच्या चुलत्याकडे इंग्लंडच्या आइल ऑफ व्हाइट येथे पाठवले. शालेय शिक्षण साउदॅम्प्टन येथे झाले. रोनाल्डचा कल अधिकतर कविता करणे, चित्रकला, संगीताकडे अधिक होता. तरुण वयात त्यांना लेखक होण्याची इच्छा होती. परंतु वडलांची इच्छा त्यांनी वैद्यकीय व्यवसायात आपले नाव कमवावे अशी होती. त्यामुळे रोनाल्ड १८७४ मध्ये लंडनच्या सेंट बार्थोलोम्यू हॉस्पिटल मेडिकल कॉलेजात दाखल झाले. मेडिकल कॉलेजातही रोनाल्ड यांनी नाटिका लिहिणे, संगीतरचना तयार करणे वगैरे छंद जोपासले, पण १८७९ मध्ये ते इंग्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची परीक्षा उत्तीर्ण झाले, पुढे  एका प्रवासी जहाजावर शल्यविशारद म्हणून नोकरी केल्यावर वर्षभराने त्यांनी लष्करी वैद्यकीय शाळेची परीक्षा दिली आणि १८८१ मध्ये ते इंडियन मेडिकल सíव्हसमध्ये रुजू झाले.

sunitpotnis@rediffmail.com