सोळाव्या, सतराव्या शतकात तत्कालीन भारतीय संस्थानात, राज्यात अनेक युरोपियन व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने आपले नशीब अजमावण्यासाठी आल्या. त्यापैकी फ्रान्समधून आलेले बोरबॉन कुटुंब हे एक. बोरबॉन कुटुंबप्रमुख सॅल्व्हाडोर डी बोरबॉन डी नॅवेर याचे नाव भोपाळच्या इतिहासात मोठय़ा आदराने घेतले जाते.

सॅल्व्हाडोर सुरुवातीला मोगल बादशाह मोहम्मद शाह याच्या दरबारात दिल्लीत नोकरीला होता. त्याने केलेल्या विशेष कामगिऱ्यांबद्दल शेरगढ इथे मोठी जहागिरी बहाल केली. सॅल्व्हाडोरने या जहागिरीत आपली छोटी वसाहत, चर्च, शाळा आणि लहान किल्ला बांधला. शेरगढची ही जहागीर दिल्लीपेक्षा ग्वाल्हेरजवळ होती. दिल्लीला सॅल्व्हाडोर मोगलांकडे नोकरीत असताना १७३९ मध्ये नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण करून दिल्ली शहर लुटले. चोवीस तासांत साधारणत २० हजार माणसांची कत्तल करून मयूर सिंहासन, कोहिनूर हिरा आणि बादशहाचे सर्व सोने आणि जडजवाहीर घेऊन नादिरशाह परत गेला. नादिरशाह दिल्लीवर चालून येतोय याची आधीच कुणकुण लागलेल्या सॅल्व्हाडोरने आपले कुटुंब आणि स्वत चार दिवस आधीच आपल्या जहागिरीत शेरगढकडे मुक्काम हलवल्यामुळे त्याची कुठल्याही प्रकारची हानी न होता सुखरूप राहिला.

शेरगढ जहागिरीवर सॅल्व्हाडोर जहागिरीची दैनंदिन कामे करण्यात व्यस्त होता. ग्वाल्हेरच्या राजाशी त्याचे संबंध मत्रीपूर्ण होते, या राजाकडे वेळप्रसंगी वैद्यकीय सेवेसाठी सॅल्व्हाडोरला बोलावले जाई. मात्र या राजाचा मृत्यू झाला आणि सर्व फासे उलटे पडले. मृत महाराजाच्या एका मुलाचे सॅल्व्हाडोरच्या वसतीवरच्या फ्रेंच लोकांशी काही तंटाबखेडा होऊन त्यांचे एकमेकांशी खटके उडायला लागले. हे प्रकरण वाढून त्या राजघराणातल्या उन्मत्त मुलाने अनेक फ्रेंच लोकांना ठार मारून अनेकांना कैद केले, सॅल्व्हाडोरची सर्व मालमत्ता हडप करून, लपून बसलेल्या सॅल्व्हाडोर आणि कुटुंबीयांचा शोध घेऊ लागला. याच काळात ब्रिटिश रेसिडंटने तपास करून अटकेत असलेल्या फ्रेंच लोकांची सुटका केली. अखेरीस सॅल्व्हाडोरने सारासार विचार करून नशीब अजमावण्यासाठी भोपाळचा रस्ता धरला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com