07 December 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : समाजाची प्रतिकृती- वर्ग

आजकाल यालाच ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणतात. अशी ‘ सॉफ्ट स्किल्स’ शिकण्यासाठी पैसे मोजावे लागतात.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

शाळेतले वर्ग हा समाजाचा एक छोटासा घटक असतो. मोठं झाल्यावर ज्या गोष्टी सामोऱ्या येणार आहेत, त्याची तयारी लहानपणापासूनच वर्गामध्ये होते – होऊ शकते.

या वर्गामध्ये येऊन मुलं विविध विषयांचं शिक्षण घेतात; ही शाळेची शिक्षणविषयक एक बाजू झाली. पण शाळा काही एवढंच शिकवत नाही.  मुला-मुलींचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व इथेच कळत-नकळत फुलत असतं.

शाळेत मुलांना खेळायला, मत्री करायला अनेक मुलं मिळतात. या वातावरणात मुलं अनेक गोष्टी शिकत असतात. समजून घेत असतात. घराबाहेर पडल्यावर कसं वागायचं असतं, मत्री कशी करायची असते, परस्परांमध्ये मतभेद कसे निर्माण होतात, मतभेद झाले तर काय उपाय, भांडाभांडी किंवा मारामारी हा त्यावर उपाय आहे का? आपले मुद्दे कसे पटवून द्यायचे? समोरच्या माणसाचे मुद्दे कसे मान्य करायचे, एखादी गोष्ट कुठपर्यंत ताणायची, कुठे सोडायची ही सर्व कौशल्ये आहेत. आजकाल यालाच ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणतात. अशी ‘ सॉफ्ट स्किल्स’ शिकण्यासाठी पैसे मोजावे लागतात. परंतु लहानपणी एक चांगली शाळा आणि खेळायला भरपूर मित्र- मत्रिणी मिळाले तर ही कौशल्यं लहानपणीच आत्मसात होतात, मुद्दाम शिकावी लागतच नाहीत. या कारणासाठीही शाळेत मोकळेपणा असायला हवा. शाळेत सर्व तऱ्हेची मुलं- मुली शाळेत आली तर त्यातून प्रत्येक न प्रत्येक मूल नवीन नक्कीच शिकेल.

एकाच प्रकारच्या आर्थिक – सामाजिक- धार्मिक- सांस्कृतिक गटातल्या मुला-मुलींबरोबर सतत राहिल्याने इतर समाज काय आहे, इतरांची मूल्यं, त्यांची जीवनशैली, त्याचे प्रश्न, त्यांच्यातले गुण समजत नाहीत. विशिष्ट गटासाठी असलेल्या शाळांमध्ये मुलं शिकली तर  इतर गटातल्या मुलांशी मत्री होत नाहीत. त्यामुळे त्यांचं जगणं कसं असतं, ती कशी राहतात, हे इतरांना कधी कळत नाही. एकमेकांविषयी आत्मीयता निर्माण होत नाही. यामुळे धोका असा निर्माण होतो की आपलं जे जग तेच खरं जग असं वाटत राहतं. आणि असं प्रत्येकच वर्गाला वाटत राहतं. त्यामुळे समाजात  सर्व गटांची  सरमिसळ होत नाही.

विविध गटातली मुलं एकत्र राहतील, खेळतील, दंगा करतील, एकमेकांच्या डब्यातलं खातील – त्याबरोबर सुख-दु:खंही वाटून घेतील. तेव्हाच खरी मत्री निर्माण होईल. मुख्य म्हणजे समाजाची बहुसांस्कृतिक वीण कळत जाईल.

First Published on October 23, 2019 2:34 am

Web Title: school classroom for personality development of boys and girls zws 70
Just Now!
X