News Flash

कुतूहल : मेंडेलची आनुवंशिकता

मेंडेलचा सिद्धांत त्याने केलेल्या वाटाण्याच्या रोपांवरील अभ्यासावर आधारला आहे.

ग्रेगॉर मेंडेल

आजच्या आनुवंशिकतेवरील संशोधनाचा पाया ऑस्ट्रियाच्या ग्रेगॉर मेंडेल याने १८६० च्या दशकात घातला. आनुवंशिक गुण हे मातापित्यांच्या गुणांचे मिश्रण असल्याचा पूर्वी समज होता. परंतु मेंडेलने संततीतील गुण हे मिश्रण नसून, एखादा गुण पुढील पिढय़ांत स्वतंत्रपणे वाहून नेला जातो हे सिद्ध केले. मेंडेलचा सिद्धांत त्याने केलेल्या वाटाण्याच्या रोपांवरील अभ्यासावर आधारला आहे. मेंडेलने वाटाण्याच्या रोपांचे परागीभवन घडवून आणून मूळ रोपांचे गुण पुढील पिढय़ांत कसे उतरतात, याचे निरीक्षण केले. या प्रयोगांसाठी मेंडलने बियांचे रंग (हिरवा-पिवळा), त्यांच्या फुलांचे रंग (पांढरा-जांभळा), खोडांची उंची (उंच-खुजे) अशा वेगवेगळ्या गुणधर्मावर आधारलेल्या वाटाण्याच्या जोडय़ा वापरल्या.

मेंडेलने आपल्या एका प्रयोगात शुद्ध स्वरूपातील हिरव्या व पिवळ्या वाटाण्यांच्या बिया घेतल्या. त्यांच्यात त्याने स्वयं-परागीभवन केले असता, या बियांची रोपे ही सतत एकाच विशिष्ट रंगाचे वाटाणे निर्माण करत होती. म्हणजे यात जातीचा अस्सलपणा टिकवून ठेवण्याचा गुणधर्म होता. दुसऱ्या प्रयोगात, या दोन प्रकारच्या बियांतून निर्माण झालेल्या रोपांवरील फुलांचे त्याने एकमेकांत पर-परागीभवन घडवून आणले. यातून निर्माण झालेले वाटाणे हे सर्व पिवळ्या रंगाचे होते. त्यानंतर या पिढीतील वाटाण्यांच्या स्वयं-परागीभवनातून निर्माण झालेल्या पुढच्या पिढीत मात्र दोन्ही प्रकारच्या वाटाण्यांची रोपे निर्माण झाली होती. यांतील पिवळ्या रंगाच्या वाटाण्यांची रोपे आणि हिरव्या रंगाच्या वाटाण्यांची रोपे, यांचे गुणोत्तर तिनास एक असे होते. या रोपांवरील वाटाण्यांपासून निर्माण झालेल्या पुढील पिढय़ांतही पिवळ्या व हिरव्या वाटाण्यांच्या रोपांचे प्रमाण तिनास एक असेच राखले गेले होते. परंतु कोठेही दोन्ही रंगांचे मिश्रण मात्र झाले नाही.

या निष्कर्षांवरून मेंडेलने मांडलेल्या सिद्धांतानुसार, प्रत्येक सजीवाची आनुवंशिकता स्वतंत्रपणे काम करते. प्रत्येक सजीवाकडे त्याच्या गुणानुरूप घटकांची जोडी असते. या घटकांपैकी जो घटक प्रभावी असेल त्या घटकाचे पुढील पिढय़ांत प्राबल्य राहते. या प्रयोगातील रोपांत पिवळ्या रंगाचा घटक हा प्रभावी होता. म्हणून नंतरच्या पिढय़ांत पिवळ्या रंगाचे प्राबल्य कायम राहिले. जनुकाची संकल्पना जन्माला येण्याअगोदरच केलेल्या या संशोधनात मेंडेलने आनुवंशिकतेचे महत्त्व ओळखले होते. मात्र मेंडेलच्या या पायाभूत संशोधनाला प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या मृत्यूनंतर सोळा वर्षांनी – १९०० साली!

– डॉ. रंजन गग्रे

मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

 

ग्रेगॉर मेंडेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2019 2:44 am

Web Title: scientist gregor mendel modern science of genetics zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : शाळा कधी आवडेल?
2 कुतूहल : पेशी सिद्धांताचा पाया
3 मेंदूशी मैत्री : निसर्ग-शिक्षण
Just Now!
X