आपल्या रूपात साक्षात पांडुरंग बादशहाकडे जाऊन सेवा करून आला, या जाणिवेनं सेना महाराजांच्या जीवनात मोठा पालट झाला, असं बुवा म्हणाले आणि त्यांनी अभंगातल्या शेवटच्या चरणावर बोट ठेवलं. बाजूलाच बसलेल्या हृदयेंद्रनं उत्सुकतेनं तो चरण वाचला..
हृदयेंद्र – सेना म्हणे हृषीकेशी। मज कारणें शिणलासी। म्हणुनि लागलों चरणाशी। संसारासी त्यागिले।।.. काय विलक्षण आहे!
योगेंद्र – पण हा जो संसाराचा त्याग आहे, तो मनातूनच असला पाहिजे..
हृदयेंद्र – अर्थातच! जोवर मन संसाराला चिकटलं असतं तोवर संसाराशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, दिसत नाही, आठवत नाही, जाणवत नाही, ऐकवत नाही, पाहवत नाही आणि म्हणूनच सोडवतही नाही!
बुवा – तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलं होतं त्याप्रमाणे! झाडाला आपणच घट्ट मिठी मारायची आणि म्हणायचं, काय करावं, हे झाडं सोडतच नाही पहा! तसं संसार आपणच घट्ट धरला आहे आणि त्यानंच आपल्याला धरल्याची बतावणी सुरू आहे.. बघा, संसार सुटत नाही आणि सोडण्याची गरजही नाही, पण मनातला त्याचा प्रभाव मात्र सुटलाच पाहिजे. त्यात खरं हित आपलंच आहे..
हृदयेंद्र – आपल्या जागी हरीनं जाऊन सेवा करण्याच्या या दाखल्यावरून एक प्रसंग आठवला.. घुमानचं नाव आता ओळखीचं झालंय.. त्या घुमानलाच पारतंत्र्याच्या काळात बाबा जैमलसिंह नावाचे मोठे सत्पुरुष होऊन गेले.. त्यांच्या साधनकाळातली गोष्ट आहे ही.. लहानपणापासूनच त्यांना ईश्वराची ओढ होती. घुमानच्या नामदेव महाराजांच्या मंदिरात बसून ‘ग्रंथसाहिबा’सह अनेक सद्ग्रंथांचं वाचन आणि मनन करण्यातही त्यांचा काळ जाऊ लागला. त्यांना या मार्गावरून परावृत्त करण्यासाठी घरच्या लोकांनी बरेच प्रयत्न करून पाहिले, पण जैमलसिंह ठाम राहिले. पुढे सद्गुरुंसाठी सुरू असलेला त्यांचा शोध आग्य््रााला संपला तो स्वामी शिवदयालसिंह महाराज यांच्या चरणांपाशी! तिथे ध्यानसमाधीतही ते तल्लीन होऊ लागले. त्यांना वाटू लागलं की आता सर्व सोडून यांच्या चरणांपाशी रहावं, भक्ती करण्यात आयुष्य व्यतीत करावं. तेव्हा ते तरुण होते बरं का! तर स्वामी महाराज काय म्हणाले? ते म्हणाले, ‘‘जगात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आचरले पाहिजेत. त्यागी रहाल तर दुसऱ्याच्या अन्नावर जगावं लागेल. त्यांच्याकडून तुमची साधनेची कमाई लुटली जाईल. साधनेसाठी स्वत:नं कमावलेल्या धनावर उपजीविका साधण्याची गरज आहे.’’ तेव्हा बाबा जैमलसिंह ऊर्फ बाबाजी लष्करात भरती झाले. एकदा ते स्वामी महाराजांकडे आले होते. रात्री उशीराची डय़ूटी होती. संध्याकाळी ते ध्यानाला बसले आणि त्यात पूर्ण निमग्न झाले. ब्रिटिशांचा काळ होता तो.. १८५६चा सुमार होता! इतर साधक स्वामी महाराजांना सांगू लागले, ‘‘यांची रात्रीची डय़ूटी आहे. पलटणीत एक मिनिटाचा विलंब झाला तरी कडक शिक्षा देतात.’’ स्वामी महाराजांच्या सांगण्यावरून मग बाबाजींची समाधी उतरवण्याचा प्रयत्न झाला, पण काही उपयोग होईना. अखेर स्वामी महाराज त्यांच्या खोलीत आले आणि प्रसन्नचित्तानं बाबाजींकडे पाहून म्हणाले, ‘‘यांना कुणी छेडू नका.. सकाळी पाहू काय होतं ते!’’ सकाळी बाबाजी पलटणीत थेट सुभेदाराकडे गेले. म्हणाले, ‘‘मी काल गैरहजर राहिलो. मला काय शिक्षा आहे?’’ सुभेदार चकित होऊन म्हणाले, ‘‘काय बोलतोयस? काल रात्री तू माझ्याबरोबर गस्त घातलीस. मग दारुगोळ्याच्या कोठाराला कुलूप लावून किल्ली मला दिलीस. पहाटे पाचच्या हजेरीच्या वेळीही तू होतास..’’ बाबाजी काही बोलले नाहीत. त्या रात्री ते पुन्हा स्वामी महाराजांकडे गेले. म्हणाले, ‘‘रात्री माझ्याऐवजी सद्गुरूंनी डय़ूटी बजावली आहे. आता श्रीचरणांखेरीज अन्य कोणाची सेवा करणार नाही.’’ स्वामी महाराजांनी त्यांना हृदयाशी धरले आणि म्हणाले, ‘‘पलटणीतही तू माझीच नोकरी करीत आहेस. जा! माझी चाकरी समजून काम कर.’’
ज्ञानेंद्र – प्रसंग मनाला भिडणारा आहे खरा.. पण बुद्धीला भिडणारा नाही! सेना महाराज किंवा बाबाजींच्या आध्यात्मिक अधिकारांविषयी दुमत नाही, पण अशा चमत्कारांची वर्णनं वाचून साधारण साधकाची आध्यात्मिक प्रगती होईल की त्याच्या मनातला गोंधळ वाढेल? चुकीच्या अपेक्षा निर्माण होतील?