News Flash

डॉ. सीताकांत महापात्र – विचार

‘आदि अन्त मध्य तू अतु सर्व थाने

१९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात डॉ. सीताकांत महापात्र आपले विचार मांडताना म्हणतात, उडिया कवी सरलादास यांच्या ‘महाभारता’च्या आदिपर्वात प्रथम अध्यायात ‘वाग्देवी’ला खाली दिलेले आवाहन केले गेलेले आहे, ज्यात तिच्या ‘अमृत-दृष्टी’चे, तिच्या मंगलमय दृष्टीचे वर्णन केले गेले आहे.

‘आदि अन्त मध्य तू अतु सर्व थाने

ग्रंथ मिएलु तू भूत भविष्य वर्तमाने’..

तू सर्वव्यापक आहेस. आदि, मध्य आणि अन्त, यामध्ये तूच आहेस. भूत, वर्तमान आणि भविष्यातील सर्व ग्रंथांचा उगमही तुझ्यात आहे.   मी त्या देवी सरस्वतीला नमन करतो, जिच्या कृपेशिवाय शब्द काव्यरूपात प्रकट होत नाहीत..

माझ्यासाठी कविता ही चाळीस वर्षांचा शोध, अधुरेपणा, अपरिपूर्णता जे कधी आनंददायी नव्हते, त्याला आणि अनुभवांच्या सतत नव्याने उमलणाऱ्या रूपांना काव्यबद्ध करण्यासाठी केलेल्या शब्दशोधाची गाथा आहे. कविता ही शब्दांची रचना आहे आणि शब्द सामाजिक स्मृतिचिन्हे आहेत. एका उत्तम कवितेत प्रत्येक शब्द काही तरी बोलतो. प्रत्येक शब्द अपरिहार्य होतो, अद्वितीय होतो. एखाद्या कवितेत शब्द मौनातूनही बोलतात. मौनभंगाच्या आशंकेने जणू ते घाबरून प्रकट होतात. कविता विद्यमान नसलेल्या गोष्टींनाही जन्म देते. अनुभवाच्या व्यग्रतेचं सिंहावलोकन कवितेला जन्म देते. एक उत्तम कविता कोणत्याही उत्तम कलाकृतीप्रमाणे सत्ची उपासना करते. खरं म्हणजे कविता ही वेगवान क्षणात येणारे अनुभव पकडण्याचा एक प्रयत्न आहे. ती एखाद्या आठवणीचा आणि कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे, जी एखाद्या घटनेचं किंवा वेगाचं वर्णन करते. ती साधारण अनुभवाला रहस्यमयता देते. त्याला एका चमत्कारात रूपांतरित करते. आमच्या युगाने आम्हाला  सर्व अस्तित्वाच्या रहस्याविषयी, आपल्या स्वत:च्या अस्तित्वाविषयी शोध घेण्यास शिकवले आहे. प्रत्येक निष्ठावान कवी हे जाणून असतो की, ही विषमावस्था त्याचीही आहे आणि हा शोध भाषेच्या शुचितेसाठी केल्या जाणाऱ्या शोधाकडे त्याला अपरिहार्यपणे घेऊन जातो. भाषा ही दोन उद्देशांनी प्रेरित असते. एक ती व्यक्तीच्या अस्तित्वाच्या वयापर्यंत पोहोचते आणि त्याबरोबरच इतरांबरोबर संपर्क प्रस्थापित करण्यासाठीही ती उपयोगी पडते.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

आण्विक वस्तुमान मापन

सर्व पदार्थ मूलद्रव्यांपासून बनलेले असतात. मूलद्रव्यांची काही उदाहरणे म्हणजे उद्जन वायू (हायड्रोजन), प्राणवायू (ऑक्सिजन), कर्ब (कार्बन) व सोने (गोल्ड) ही आहेत. अणू हा मूलद्रव्याचा सर्वात छोटा कण असतो. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये त्या मूलद्रव्याचे सर्व विशिष्ट गुण सामावलेले असतात. त्याचे आकारमान एक अब्जांश मीटरहूनही लहान असते. जशी एखादी भिंत दगड किंवा विटांपासून बनवलेली असते; त्याचप्रमाणे प्रत्येक पदार्थ हा अब्जावधी अणूंपासून बनलेला असतो. सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेल्या असतात. अणूची त्रिज्या सुमारे १०-१० मीटर असते आणि त्यात १०-१४ मीटर अथवा त्याहूनही लहान आकाराचा एकच अणुगर्भ असतो.

अणूची स्वत:ची अंतर्गत रचना असते. मध्यवर्ती अणुकेंद्रकात (अणुगर्भात) दोन प्रकारचे कण असतात. ते म्हणजे पदार्थास धन विद्युतभारित करणारे कण म्हणजे धनक (प्रोटॉन, ढ) आणि पदार्थास विद्युतभारविहीन म्हणजेच, विरक्त करणारे कण म्हणजे विरक्तक (न्यूट्रॉन, ठ).

कोणत्याही मूलद्रव्यातील धनकांची संख्या ढ आणि विरक्तकांची संख्या ठ असल्यास त्यांची बेरीज केल्यास अणूचे वस्तुमान अथवा त्याचा अणुभार अ समजतो. अणुभार अ=ढ+ठ.

कोणत्याही मूलद्रव्याचा अणुक्रमांक ९ हा त्यातील धनकांच्या संख्येइतकाच असतो, म्हणून अणुक्रमांक    अणुकेंद्रकाचा आकार = १०-१४ मीटर असून अणूचा आकार = १०-१० मीटर इतका असतो. या अणुकेंद्रकाभोवती पदार्थास ऋण विद्युतभारित करणारे विजेचे अनेक कण, विजक (ऋणक, इलेक्ट्रॉन, ए)  विशिष्ट कोनातून, विशिष्ट कक्षेत फिरत असतात.

प्रत्येक अणूमध्ये धनक व विजकांची संख्या समान असते, त्यामुळे प्रत्येक अणू हा विद्युतभाररहित असतो. उदासीन, विरक्त असतो. पदार्थाच्या अणूंचे वस्तुमान ‘आण्विक-वस्तुमान-एकक’मध्ये  म्हणजेच ‘आवए’मध्ये मोजले जाते.

१ आवए = १.६६ ७ १०-२७ कि.ग्रॅ. वस्तुमान असते. धनकाचे वस्तुमान = १.००७२७७ आवए, विरक्तकाचे वस्तुमान = १.००८६६५ आवए, विजकाचे वस्तुमान = ०.०००५४९ आवए असते. धनक आणि विरक्तक सुमारे सारख्याच वस्तुमानाचे असतात, तर विजक मात्र धनकापेक्षा वस्तुमानाने, १,८३६ पट लहान असतो.

– नरेन्द्र गोळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 12:03 am

Web Title: sitakant mahapatra part 4
Next Stories
1 सीताकांत महापात्र.. ‘शब्दशोधाची गाथा ’!
2 सीताकांत महापात्र : मराठी अनुवाद
3 सीताकांत महापात्र : काव्यसंपदा
Just Now!
X