22 October 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : झोपेतली ‘वर्गवारी’, कंटाळ्याचा ‘प्रवास’!

झोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते, कारण झोपेत देखील मेंदूचं काम थांबत नाही

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

एखादी गोष्ट दीर्घकाळ लक्षात ठेवण्याच्या कामात आपल्याला कोण मदत करतं?.. तर आपली झोप. पुरेशी झोप. पूर्ण झोप झाली नाही, तर चिडचिड होते. एकाग्रतेवर परिणाम होतो. म्हणून ठरलेल्या वेळी सर्व कामं संपवत आणावीत आणि शांत झोपावं.

झोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते, कारण झोपेत देखील मेंदूचं काम थांबत नाही. ते चालूच असतं. उलट झोपेच्या अवस्थेत मेंदूत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतात. या घडामोडी शिक्षणाला मदत करत असतात.जेव्हा आपण अगदी गाढ झोपेत जातो, तेव्हा मेंदू दिवसभरात घडलेल्या गोष्टींची वर्गवारी करायला घेतो. कोणत्या घटनेचे सिनॅप्स उद्याच्या दिवसासाठी उपयुक्त आहेत ते अल्पकालीन स्मृतीकेंद्राकडे (शॉर्ट टर्म मेमरी) पाठवा. कोणती घटना नको आहे, ती विसरून जा. असं त्याचं काम चालू असतं. हे केवळ अभ्यासाच्या बाबतीत आणि लहान मुलांच्याच मेंदूत चाललेलं असतं असं नाही. तर मोठय़ांच्या मेंदूतही वर्गवारी चालूच असते.

कुतूहल ते कंटाळा

कुतूहल ही मानवी मेंदूची फार महत्त्वाची क्षमता. लहान मुलांमध्ये पराकोटीचं कुतूहल असतं. समजा एक छान वाजणारं खेळणं मुलांना दाखवलं तर त्या खेळण्याचा आकार, आवाज त्यांना आवडतो. त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होतं. मूल त्याच्याशी खेळतं. ते एकच खेळणं सतत खेळायला दिलं तर एक दिवस त्यातलं नावीन्य संपतं. या खेळण्यापासून कोणतीही नवी माहिती आता मेंदूला मिळत नसते. साहजिकच खेळण्याचा त्याला कंटाळा येतो.

अचानक एक दिवस वेगळ्या आकारातलं, वेगळं खेळणं दिलं तर नवीन माहिती मिळण्याच्या आनंदात मूल आता या खेळण्याकडे कुतूहलाने बघतं.

आपल्या प्रत्येकाच्याच मेंदूत असा कुतूहल ते कंटाळा हा प्रवास होत असतो. म्हणून मेंदू रोजच्या रूटीनमुळे कंटाळला आहे असं वाटलं तर कोणतंही एक नवं आव्हान स्वीकारायचं. जी गोष्ट आजवर कधी केली नाही ती करायला घ्यायची. म्हणजे न्यूरॉन्स नव्याने जुळतात, मेंदू पुन्हा तरतरीत होतो!

 

First Published on January 10, 2019 2:01 am

Web Title: sleep is very essential for brain health