मोहम्मद पगंबरांच्या निधनानंतर इ.स. ६३२ ते ६६१ या काळात चार खलिफांनी अरब राष्ट्रांमधील खिलाफत सांभाळली. त्यानंतर प्रशासन आणि इस्लामची सूत्रे उमया वंशाकडे जाऊन खिलाफतशाही राजेशाहीत परावíतत झाली. उमया राजवटीत राजकीय, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मोठे बदल घडून आले. बतुलमाल म्हणजे राष्ट्रीय कोषावर राजाचे वैयक्तिक अधिकार प्रस्थापित झाले. व्यसनांमध्ये बेधुंद झालेल्या उमया खलिफांच्या या काळात सामान्य लोकांवरील अन्याय, अत्याचार वाढून अनागोंदी माजली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भ्रष्ट राजवटीच्या या काळात अनेक बुद्धिवादी लोकांनी राजदरबार आणि खलिफाशी असलेले संबंध तोडून स्वतला ईश्वर चिंतनात गुंतवून घेतले, त्यासाठी एकांतवास स्वीकारला. या लोकांनी उमयांच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध बंड न करता स्वतच एकांतवासात जाणे पसंत केले. या एकांतवासात जे गूढवादी तत्त्वज्ञान प्रकट झाले त्यातूनच सूफी मताचा उगम झाला, यातूनच सूफी विचारांचे बीजारोपण झाले असे म्हणता येईल.

बसरा आणि कुफा या अरेबियाच्या दोन शहरांत पहिली सूफी केंद्रे होती. प्रारंभापासून सूफी आणि उलेमा म्हणजे धर्मपंडित यांच्यात कधीच सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले नाहीत. त्यामुळे सुफी संतांना सुरुवातीस मोठय़ा विरोधास तोंड द्यावे लागले.

अकराव्या ते पंधराव्या शतकाच्या काळात सूफी मताचा प्रसार होऊन आफ्रिका, इराण, इराक, सौदी अरेबिया आणि हिंदुस्थानपर्यंत तो पोहोचला. हिंदुस्थानात १०३६ साली प्रथम आलेले सूफी संत शेख अली हुज्वेरी हे होत. त्याचप्रमाणे इराण, इराक वगरे देशांमध्ये प्रथम आलेल्या सूफींनी आपापले शिष्य तयार केले. या गुरू-शिष्यांचे वेगवेगळे गट, परंपरा निर्माण झाल्या. जगभरात सूफी गुरू-शिष्यांच्या अशा १७३ परंपरा आहेत. हिंदुस्थानात प्रथम आलेले सूफी संत शेख अली हुज्वेरी यांची समाधी आणि दर्गा लाहोरमध्ये आहे. सेतुमाधवराव पगडी असे लिहितात की भारतात अनेक सूफी परंपरांचा उदय झाला त्यापकी चिश्तिया, कादरिया, सुहरवर्दी आणि नक्षबंदी या चार अधिक प्रचलित होत्या.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sufi philosophy
First published on: 26-06-2018 at 03:28 IST