सूर्याच्या पृष्ठभागावर आणि अंतरंगात काय उलथापालथ चाललेली असते, याची कल्पना करणे हे काही शतकांपूर्वी कठीणच होते! तरीही शास्त्रज्ञांनी त्या काळीही निरीक्षणे करून सूर्याबाबत काही महत्त्वाची अनुमाने काढली. त्यातील एक अनुमान म्हणजे ‘सौरचक्र’! दुर्बिणीतून पाहिले असता, सूर्याच्या पृष्ठभागावर काळपट डाग दिसतात. या ‘सौरडागां’ची संख्या बदलत असते. या डागांची निरीक्षणे १६१० सालापासून हॅरिएट, गॅलिलिओ, फॅब्रिशियस, शायनर अशा अनेकांकडून केली गेली. सौरडागांच्या शोधानंतर दोन शतकांनी- जर्मनीच्या हाइन्रिश श्वाब याने १७ वर्षांच्या निरीक्षणांवरून १८४३ मध्ये हे दाखवून दिले, की सौरडागांची संख्या एका ठरावीक काळाने कमी-जास्त होते. श्वाबने १८२५ साली सुरू केलेली ही निरीक्षणे १८६७ पर्यंत सुरू ठेवली होती.

श्वाबने काढलेल्या या निष्कर्षांनंतर, स्वित्र्झलडच्या रुडॉल्फ वोल्फने सौरडागांच्या पूर्वीपासूनच्या निरीक्षणांचा अभ्यास केला. श्वाब आणि वोल्फच्या अभ्यासावरून सौरडाग हे दहा ते अकरा वर्षांच्या चक्रानुसार कमी-जास्त होत असल्याचे स्पष्ट झाले. १८४८ साली वोल्फने सौरडागांची संख्या सुलभरीत्या दर्शवण्यासाठी ‘वोल्फ नंबर’ म्हणून ओळखले जाणारे सूत्र तयार केले. त्याने इ.स. १७५५ ते १७६६ या काळातील सौरचक्राला ‘पहिले सौरचक्र’ म्हणून संबोधले आणि त्यानंतरच्या सौरचक्रांना त्यापुढचे क्रमांक दिले. सौरडागांची वाढती संख्या ही सूर्य अधिकाधिक सक्रिय होत असल्याची चिन्हे असतात. या काळात सूर्याकडून उत्सर्जित होणाऱ्या सौरज्वालांचे आणि प्रारणांचे प्रमाणही वाढलेले असते.

सौरडागांचा चुंबकत्वाशी संबंध आहे. अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ जॉर्ज हेल याने १९०८ साली हा संबंध सिद्ध केला. झीमानच्या परिणामा(झीमान इफेक्ट)चा वापर करून वर्णपटशास्त्राच्या आधारे असे चुंबकत्व पृथ्वीवरील निरीक्षणांद्वारे मापणे शक्य असते. त्यानुसार माऊंट विल्सन सौरवेधशाळेतील दुर्बिणीचा वापर करून जॉर्ज हेलने सौरडागातील चुंबकत्व मोजले. सौरडाग म्हणजे अत्यंत तीव्र चुंबकत्वाची ठिकाणे असल्याचे दिसून आले. सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील सौरडागांचे चुंबकीय ध्रुव एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. ११ वर्षांच्या एका चक्रानंतर सौरडागांच्या चुंबकीय ध्रुवांची दिशा उलटी होते. त्यानंतर ११ वर्षांच्या पुढील चक्रानंतर त्यांना पुन्हा मूळची चुंबकीय दिशा प्राप्त होत असल्याचे हेलने १९१९ साली दाखवून दिले. जॉर्ज हेलचे हे संशोधन, एक सौरचक्र हे प्रत्यक्षात २२ वर्षांचे असल्याचे दर्शवत होते!

– मृणालिनी नायक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org