25 April 2019

News Flash

विवेकानंद शिष्या निवेदिता (२)

स्वामी विवेकानंदांच्या थोर शिष्या, ‘भगिनी निवेदिता’ या नावाने भारतात परिचय असणाऱ्या मार्गारेट नोबलचे शिक्षण लंडनमध्ये झाले.

स्वामी विवेकानंदांच्या थोर शिष्या, ‘भगिनी निवेदिता’ या नावाने भारतात परिचय असणाऱ्या मार्गारेट नोबलचे शिक्षण लंडनमध्ये झाले. शिक्षणानंतर त्यांनी दहा वर्षेलंडनच्या एका शाळेत नोकरी केली. सात्त्विक, धर्मपालन करणाऱ्या ख्रिश्चन कुटुंबातल्या मार्गारेटनी ख्रिश्चन तत्त्वज्ञानाचा अभ्यास लहानपणापासूनच केला होता, परंतु त्यात काहीतरी कमतरता असल्याचे त्यांना जाणवत होतं. त्यामुळे इतर धर्माची तांत्रिक माहिती करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

१८९५ साली अमेरिकेतून भारतात परत येताना स्वामी विवेकानंदांचा मुक्काम लंडनमध्ये तीन महिन्यांसाठी होता. लंडनमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां आणि प्रतिष्ठित घराण्यातल्या लेडी इसाबेल माग्रेसन यांच्याकडे त्यांचा मुक्काम होता. इसाबेलबाई अधूनमधून लंडनमधल्या विद्वानांना, धार्मिक अभ्यासूंना आपल्या घरी बोलवून विवेकानंदांबरोबर त्यांची चर्चा घडवून आणत असत. अशाच एका चच्रेसाठी मार्गारेट त्यांच्या ओळखीच्या एका गृहस्थांबरोबर इसाबेल यांच्या घरी आल्या. स्वामी विवेकानंदांच्या वेदान्त तत्त्वज्ञानाने, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, त्यांच्या चिंतनाने भारावून गेलेल्या मार्गारेट, पुढे स्वामीजींच्या लंडनमधील प्रत्येक व्याख्यानाला उपस्थित राहू लागल्या. व्याख्यानांनंतर त्या स्वामीजींना आपल्या मनातील तत्त्वज्ञानविषयक प्रश्न विचारून त्यांना सद्गुरूस्थानी मानू लागल्या.

स्वामींनाही मार्गारेटमध्ये सेवाभावी आणि निश्चयी वृत्तीची एक कार्यकर्ती दिसली. त्यांनी मार्गारेटला भारतात येऊन आपल्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. मार्गारेटने मोठय़ा आनंदाने स्वामीजींचे आवाहन स्वीकारले आणि त्या १८९८ मध्ये भारतात कलकत्त्यात आल्या. रामकृष्ण आश्रमात त्यांची राहण्याची व्यवस्था होती. रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवींच्या आशीर्वादाने त्यांच्या आश्रमीय सेवाभावी जीवनाला सुरुवात झाली. २९ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी मार्गारेटना शिष्यत्वाची दीक्षा देऊन ‘भगिनी निवेदिता’ असं त्यांचं नामकरण केलं. स्वामींनी त्यांना सांगितले होते की, कोणत्याही अभारतीय व्यक्तीने भारतात काम करण्यासाठी हिंदू चालीरीती, संस्कार ग्रहण करून संपूर्ण हिंदू होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे निवेदितांनी सहा-आठ महिन्यांत ते संस्कार, बंगाली आणि हिंदी भाषा आत्मसात करून भारत हेच आपले कार्यक्षेत्र बनवले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on December 6, 2018 12:03 am

Web Title: swami vivekananda 5