व्हिस्कोज तंतू हा नैसर्गिक सेल्युलोजपासून पुनर्जनित तंतू आहे. कापसाच्या जवळपास जाणारा तंतू म्हणून व्हिस्कोज तंतू खूप प्रसिद्ध झाला असला तरी तो पूर्णपणे कापसाची जागा घेऊ शकला नाही. कारण कापसाबरोबर तुलना केल्यास व्हिस्कोज तंतूंमध्ये मोठय़ा प्रमाणावर कमतरता आढळते. व्हिस्कोज तंतूंची कोरडय़ा स्थितीतील ताकद (तन्यता) कापसापेक्षा ३० ते ३५% कमी असते आणि ओला झाल्यावर ही ताकद आणखी ५०% ते ७०% एवढी कमी होते. व्हिस्कोजची स्थितिस्थापकतासुद्धा कापसापेक्षा खूपच कमी असते. म्हणून व्हिस्कोज तंतूंपासून तयार केलेले कपडे लवकर चुरगळतात. हे दोष कमी करून कापसाच्या बरोबरीने गुणधर्म असणारे तंतू निर्माण करण्यासाठी व्हिस्कोजच्या उत्पादन प्रक्रियेत सुधारणा करून अधिक चांगले व्हिस्कोज तंतू तयार करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांचे फळ म्हणून विविध प्रकारचे सुधारित व्हिस्कोज तंतू बाजारात आले, उदा. पॉलिनोझिक, उच्च आद्र्र स्थितिस्थापकत्व तंतू, मोडाल तंतू, लॉयोसेल तंतू इत्यादी. यापकी प्रथम आपण पॉलिनोझिक तंतूची माहिती घेऊ.   कुठलाही मानवनिर्मित तंतू तयार करताना तंतू ज्यापासून तयार होणार तो पदार्थ (द्रावण/ साका/ वितळ) तनित्राच्या सूक्ष्म छिद्रातून तंतूंच्या रूपात जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्यामध्ये बहुवारिकाचे रेणू अस्ताव्यस्त स्थितीत असतात. अशा रचनेमुळे तंतूंमध्ये ताकद वा इतर गुणधर्म पुरेसे विकसित झालेले नसतात. यासाठी तंतूचे घनीकरण व्हावयाच्या पूर्वी त्याला मोठय़ा प्रमाणावर खेच द्यावा लागतो. या खेचामुळे तंतूमधील बहुवारिकाचे रेणू एकमेकांशी व तंतूच्या लांबीशी समांतर केले जातात, रेणूंची ही रचना तंतूंना चांगली ताकद व स्थितिस्थापकता प्रदान करतात. व्हिस्कोजच्या आद्र्र कताईमध्ये तंतूंचे घनीकरण कमी वेळात होत असल्याने पुरेसा खेच देण्यास वेळ मिळत नाही. म्हणून पॉलिनोझिक तंतूंच्या आद्र्र कताईमध्ये कताईच्या भांडय़ात गंधक आम्लाबरोबर झिंक सल्फेट व सोडियम सल्फेट ही रसायने मिसळली जातात आणि कताईच्या द्रावणाचे तापमानसुद्धा अतिशय कमी ठेवले जाते. या सर्वामुळे तंतूंच्या घनीकरणाची प्रक्रिया विलंबाने होते आणि तंतूंना पुरेसा खेच देण्यास वेळ मिळतो.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थानांची बखर – धार संस्थान स्थापना
सुप्रसिद्ध राजा विक्रमादित्य याने धार हे शहर पहिल्या शतकात वसवून उज्जयिनी (उज्जन) येथील आपली राजधानी धार येथे हलविली. तलवारीच्या पात्यांचे गाव या अर्थी ‘धारलांग’ या नावाचे गाव पूर्वी येथे होते. मोगल सत्ता प्रबळ झाल्यावर उज्जन, धार वगरे माळव्याचा बहुतेक प्रदेश त्यांच्या राज्यक्षेत्रात आला. पुढे १७२८ साली बाजीराव पेशव्यांनी आपले विश्वासू सेनानी राणोजी िशदे तसेच स्थानिक शासक मल्हारराव होळकर आणि उदाजीराव पवार यांना बरोबर घेऊन माळव्याची मोहीम काढली. मोहीम फत्ते झाल्यावर उदाजीरावांस त्यांच्या कामगिरीबद्दल इनाम म्हणून धार आणि आसपासची ३८ गावे जहागिरीत दिली. उदाजीरावांनी धार येथे राज्य स्थापन केले त्यानंतर थोडय़ाच दिवसांत त्याचे बाजीरावांशी मतभेद झाल्यामुळे बाजीरावाने उदाजीरावास मुलतानच्या मोहिमेवर पाठवून आनंदराव पवाराला धारचा शासक म्हणून नेमले.
यशवंतराव पवार हा धारचा राजा १७६१ च्या पानिपतच्या युद्धात मारला गेल्यानंतर राज्यात सर्वत्र गोंधळ माजला. त्यातच पेंढाऱ्यांनी धारवर सतत धाडी घालून राज्याला अवकळा आणल्यामुळे तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धानंतर तत्कालीन शासक रामचंद्ररावने ब्रिटिशांशी १८१८ मध्ये संरक्षण करार केला. पंधरा तोफांच्या सलामीचा बहुमान दिलेल्या धार संस्थानात ४६०० चौ.किमी.चा प्रदेश अंतर्भूत होता आणि संस्थानाची लोकसंख्या १९४१ साली २,५३,००० होती.

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Synthetic fibers
First published on: 20-03-2015 at 01:01 IST