मानवी शरीराच्या निरोगी, सुदृढ वाढीसाठी सर्व आवश्यक मूलद्रव्यांची गरज असते. या मूलद्रव्यांपैकी काही मोठय़ा प्रमाणावर, तर उरलेले सूक्ष्म प्रमाणात लागतात. लोह हे रक्तनिर्मिती आणि वाढीसाठी लागणारे मुख्य मूलद्रव्य आहे. त्याच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो, तर जस्त हे सूक्ष्म मूलद्रव्य आपल्या शरीरात जीवनसत्त्व ‘अ’च्या वहनासाठी आवश्यक आहे. ‘अ’ हे जीवनसत्त्व निरोगी दृष्टीसाठी गरजेचे आहे. मात्र जस्ताच्या कमतरतेमुळे त्याचे वहन व्यवस्थित न झाल्यास दृष्टिदोष निर्माण होतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोतीिबदू.

मानवी शरीरास आवश्यक असणारे जस्त आपल्याला शाकाहारी आणि मांसाहारी आहारातून सहज उपलब्ध होते. तृणधारी धान्य, प्राण्यांचे मांस हे या मूलद्रव्याने भरपूर असते. शेतजमिनीमध्ये संयुगांच्या स्वरूपात उपलब्ध असणारे जस्त पाण्यात विद्राव्य असते म्हणूनच मुळांच्या मार्गाने ते सहज शोषले जाते. वनस्पतींच्या प्रत्येक जिवंत पेशीमध्ये हे मूलद्रव्य त्याच्या सूक्ष्म अवस्थेत विविध विकरांना जैविक रासायनिक क्रिया करण्यासाठी साहाय्य करते म्हणूनच तर पेशींचे नियमित विघटन होऊन वनस्पतींची वाढ निरोगी होते. सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनीत ते मुबलक असते, मात्र रासायनिक खतांच्या जमिनीत त्याची कमतरता बऱ्यापैकी जाणवते. जस्ताच्या कमतरतेमुळे पिकांची पाने देठांच्या वरच्या बाजूस पानांच्या रेषामध्ये पिवळी पडतात. या मूलद्रव्य कमतरतेच्या रोगास ‘क्लोरॉसिस’ असे म्हणतात. जस्त हे हरितद्रव्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करते. हे मूलद्रव्य आपणास ताज्या हिरव्या भाज्या, फळे आणि कडधान्यामधून सहज उपलब्ध होते. काकडी, भोपळा यांच्या बियांमध्ये ते विपुल प्रमाणात आढळते म्हणूनच आपल्या दैनंदिन आहारात कच्च्या भाज्या, काकडी यांसारखी फळे यांचा समावेश असणे गरजेचे असते.

आपल्या शरीरामध्ये पेशी विघटनाबरोबरच ते पेशींची झीज कमी करण्याचेही कार्य करते. जीवनसत्त्व ‘अ’ आणि जस्त हे दोघे एकत्र असतील तरच यकृतामधून या जीवनसत्त्वाचे वहन शरीराच्या सर्व पेशींकडे होऊन आपली प्रतिकारशक्ती वाढते. बालकांचे कुपोषण, त्यास जडलेले अंधत्व आणि त्यांचे अकाली वयात अतिसारामुळे (डायरियामुळे) होणारे बालमृत्यू यांचा त्यांच्या आहारामधील जस्ताच्या कमतरतेशी फार जवळचा संबंध आहे म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेसाठी या मूलद्रव्याची कमतरता हा अग्रक्रमाने चर्चिला जाणारा संशोधनाचा विषयसुद्धा आहे.

– डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org