News Flash

कुतूहल : संख्याशास्त्रीय आलेखांचे अर्थ

वृत्तालेख (पायग्राफ) गुणात्मक सामग्रीतील विविध प्रवर्गांचे प्रमाण विविध पाकळ्यांमध्ये दर्शवतो.

दंडिकालेखात (बार ग्राफ) विविध प्रवर्गांची तुलना करता येते. स्तंभालेखात (हिस्टोग्राम) दंडिका चल (उदा. उंची, वय) असलेल्या संख्यात्मक सामग्रीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे दंडिकांमध्ये अंतर नसते. दंडिकांची उंची वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सी) प्रमाणात असते. उदाहरणार्थ, गणितात रस असणाऱ्या विविध वयोगटांतील लोकांची सामग्री स्तंभालेखात दर्शवून सर्वात जास्त रस असणाऱ्या लोकांचा वयोगट कळतो. सामग्रीच्या वर्गवारीचे वितरण, वितरणाचा आकार, मध्य आणि प्रस्तार; थोडक्यात- सामग्री कशाप्रकारे विभागली आहे ते, स्तंभालेखात स्पष्ट दिसते.

वृत्तालेख (पायग्राफ) गुणात्मक सामग्रीतील विविध प्रवर्गांचे प्रमाण विविध पाकळ्यांमध्ये दर्शवतो. उदाहरणार्थ, आर्थिक संकल्पात अपेक्षित उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाचे घटक यांची कल्पना मांडणे. यात वर्तुळाचे क्षेत्रफळ वारंवारतेच्या प्रमाणात असते. मोठी पाकळी घड्याळातील १२ वाजल्याच्या स्थानापासून सुरू होते. इतर पाकळ्या उतरत्या क्रमाने दर्शवल्या जातात. प्रत्येक पाकळीमध्ये त्या-त्या घटकाचे विवरण दिलेले असते. कृषी, पाणीपुरवठा, उद्योग, वाहतूक, संरक्षण यांसाठी सरकारी खर्च किती प्रमाणात होतो, हे एका दृष्टिक्षेपातच वृत्तालेख सांगतो आणि त्यात तुलनाही करता येते. तुलना करताना वृत्तालेख टक्केवारीवर आधारित असतो. दोन किंवा अधिक चल असलेल्या सामग्रीसाठी दोन किंवा अधिक वृत्तालेख काढून त्यांच्यात तुलना करता येते. वैद्यकीय संख्याशास्त्राच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी लष्करी रुग्णालयातील मृत्युदराची हंगामी कारणे प्रदर्शित करण्यासाठी रोझ रेखाकृती (आधुनिक वृत्तालेखाचे पूर्वरूप) काढल्या होत्या. जेव्हा दोन घटकांमधील फरक अगदी कमी असतो, तेव्हा तंतोतंत आकलनासाठी दंडिकालेख वृत्तालेखापेक्षा अधिक कार्यक्षम असतो.

विकीर्णतालेख (स्कॅटरप्लॉट) काळानुसार न बदलणाऱ्या दोन संख्यात्मक सामग्रीतील सहसंबंध (कोरिलेशन) जाणण्यासाठी असतो. सामग्री कार्टेशियन निर्देशकात मांडली जाते. त्यात स्वतंत्र (इंडिपेण्डेंट) चलाचा अवलंबित चलावरील परिणाम दिसतो. त्यामुळे अवलंबित (डिपेण्डेंट) चलाच्या भविष्यातील वर्तनाचा अंदाज बांधता येतो. सहसंबंध सकारात्मक असतो तेव्हा दोन्ही चलांच्या संख्या वाढतात. अभ्यासाचे तास आणि परीक्षेतील गुण यांतील संबंध विद्यार्थ्यांना कळू शकतो. सहसंबंध नकारात्मक असतो तेव्हा एका चलाची संख्या वाढती तर दुसऱ्याची कमी होत असते. जसे की, समुद्रसपाटीपासून उंची आणि तापमान. या विकीर्ण बिंदूंमधून जाणाऱ्या सरळ रेषेला ‘लाइन ऑफ बेस्ट फिट’ म्हणतात. ती पुढे नेल्यास पूर्वीच्या सामग्रीवर आधारित भविष्यातील कल सांगते. सामग्रीच्या (संख्यात्मक, गुणात्मक, मिश्रित) आणि चलांच्या (स्वतंत्र, अवलंबित) प्रकारानुसार आलेख निवडायला हवा. – निशा पाटील     

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:09 am

Web Title: the meaning of statistical graphs akp 94
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : वादळी ग्रेनाडा
2 कुतूहल : संख्याशास्त्रीय आलेखांचे स्वरूप
3 कुतूहल : सांख्यिकीय विश्लेषण
Just Now!
X