सुनीत पोतनीस

भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येथील विभिन्न प्रदेशातील स्थानिक भाषा शिकणे हे कंपनीचा कारभार सुरळीत चालावा म्हणून आवश्यक होते, तसेच युरोपियन ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठीही आवश्यक होते. त्यापैकी अनेक अधिकारी आणि मिशनरी येथील स्थानिक भाषा आत्मसात करून त्या भाषेतील विविध साहित्य, विशेषत: धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करण्यात गढून गेले. महाराष्ट्रात आलेल्या मिशनऱ्यांनी बायबलसारखे धर्मग्रंथ मराठीत अनुवादित करणे, मराठीच्या माध्यमातूनच लोकांमध्ये प्रसारित करणे हे त्यांच्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असल्यासारखे होते.

जस्टिन अ‍ॅबट हेही मिशनरीच. मात्र, महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकणे हा केवळ आपल्या कामाचा एक भाग म्हणून न मानता त्यांनी मराठी संतवाङ्मयाचा सखोल अभ्यास केला. त्यांना  संतवाङ्मयाने अशी काही भुरळ घातली, की येथे ते ज्या धर्मप्रसाराच्या कामासाठी आले, त्याला गौणत्व देऊन त्यांनी मराठी संतांच्या साहित्याचे इंग्रजीत अनुवाद करणे व त्या विषयावर मराठीत स्वत:ची साहित्यनिर्मितीही करणे यालाच महत्त्व दिले.

मराठी संतवाङ्मयाचे परदेशी लेखक म्हणून ज्यांचे नाव प्रामुख्याने मराठी साहित्याच्या इतिहासात घेतले जाईल असे हे जस्टिन एडवर्ड अ‍ॅबट एक अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी होते. त्यांचा जन्म १८५३ सालचा, अमेरिकेत न्यू हँपशायरमधील पोर्टस्माऊथ येथील. त्यांचे अनेक पूर्वज ख्रिस्ती धर्मप्रसारक आणि मठाधिपती असल्याने अनेक पिढय़ांपासून ‘अ‍ॅबट’ हेच उपनाव लावीत असत. चर्चमधील जुजबी शिक्षणानंतर जस्टिनच्या इच्छेप्रमाणे त्यांनी पाच वर्षे पोर्टस्माऊथमध्ये धर्मोपदेशकाचे काम केल्यानंतर त्यांना भारतामध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकार्यासाठी मिशनरी म्हणून पाठवण्यात आले. जस्टिन १८८१ मध्ये महाराष्ट्रात अहमदनगर येथे आले. ते जवळपास तीस वर्षे अहमदनगरमध्ये राहिले. या काळात जस्टिन यांनी संतवाङ्मयाचा अभ्यास मराठीतून केला आणि संस्कृतमधून वेदान्त तत्त्वज्ञान वाचले, तसेच वेदसंपन्न विद्वानांबरोबर त्यासंबंधी चर्चा केली. पुढे त्यांनी या सर्व अभ्यासातून ‘महाराष्ट्र कवी संतमाले’मधील एकंदर अकरा पुस्तके लिहिली.

sunitpotnis@rediffmail.com