सर्वसाधारणपणे रुग्णवाहिका या मनुष्य आणि प्राणी यांच्या आरोग्याशी निगडित आपत्कालीन सेवेसाठी २४ तास उपलब्ध असतात. दूरध्वनी केला की, ती तुमच्या दारात डॉक्टरांच्या सेवेसह हजर होते, पण वृक्षांचे काय? मनुष्य, प्राणी, पक्षी आणि इतर जैवविविधतेला आधार, आरोग्य देणारे अनेक वृक्ष अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर पडतात, काही वादळवाऱ्यात मुळांसह उन्मळून कोसळतात, तर काही त्यांच्या फांद्या वेडय़ावाकडय़ा तोडल्यामुळे अपघातास कारणीभूत ठरतात. चेन्नई येथे २०१६ आणि २०१८ मध्ये झालेल्या भयानक चक्रीवादळांमुळे हजारो वृक्ष अक्षरश: मुळांसकट उपटले गेले आणि त्यांचे पुनरेपणसुद्धा होऊ शकले नाही. या झाडांची वेदना चेन्नईतील तरुण वृक्षप्रेमी डॉ. अब्दुल घनी यांना जाणवली आणि यावर उपाय म्हणून त्यांनी अशा झाडांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी ‘वृक्षवाहिका’ सेवा सुरू करण्याचे ठरवले. त्यांना सुरेश जाधव या तरुणाची साथ मिळाली. २२ मे २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनानिमित्ताने या वृक्षवाहिकेचे रीतसर उद्घाटन होऊन ही सेवा अस्तित्वात आली.

ही वृक्षवाहिका अद्ययावत तर आहेच, शिवाय जेसीबी यंत्रासह ती इच्छित स्थळी हजर होऊ शकते. या वृक्षवाहिकेमध्ये वृक्षतज्ज्ञ, वृक्ष लागवड/ पुनरेपण यंत्रणा, वृक्षांना कीटक/ बुरशीमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करणारी औषधे आणि यंत्रणा, वृक्षरोपे, पाणी, खत, अवजारे आणि कुशल कर्मचारी असतात. हेल्पलाइनवर दूरध्वनी आल्यावर अल्पावधीत ही अद्ययावत वृक्षवाहिका जखमी अथवा मदत अपेक्षित असलेल्या वृक्षापाशी पोहोचते आणि पुढील कार्यवाहीस सुरुवात होते. आमंत्रित केल्यास ही वृक्षवाहिका सेवा शाळा किंवा महाविद्यालयांस भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना वृक्षांचे, त्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व कृती-प्रात्यक्षिकांसह समजावूनही देते. वृक्षवाहिकेच्या या उत्कृष्ट कार्यासाठी सुरेश जाधव आणि डॉ. अब्दुल घनी या दोघांचा ‘ग्रीन मॅन ऑफ इंडिया’ हा पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला आहे. आता पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील हजारो वृक्ष उन्मळून पडतील. आपापल्या शहरांमध्ये अशी वृक्षवाहिका सेवा निर्माण करता येईल काय? स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी या दृष्टीने विचार करायला हवा!

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

office@mavipamumbai.org