News Flash

नवदेशांचा उदयास्त : ‘न्यू स्पेन’मधील त्रिनिदाद

पंधराव्या शतकाच्या अखेरीस स्पॅनिश लोकांनी त्रिनिदादबेटावर प्रवेश केला आणि वर्चस्व वाढवून वसाहत स्थापन केली

पंधराव्या शतकाच्या अखेरीस स्पॅनिश लोकांनी त्रिनिदादबेटावर प्रवेश केला आणि वर्चस्व वाढवून वसाहत स्थापन केली. इ.स. १४९८ ते १७९७ अशी साधारणत: ३०० वर्षे त्रिनिदादस्पॅनिश अंमलाखाली राहिला. स्पॅनिश वसाहतवाले स्थानिक आदिवासींवर सक्तीची मजुरीची कामे लादून अत्यंत क्रूरपणे वागत, त्यांना चाबकाने मारण्याचीही प्रथा होती. स्पॅनिश कॅथलिक मिशनची त्रिनिदादबेटावर केंद्रे सुरू करून या बेटावर ख्रिस्ती धर्मप्रसार करणे हाही स्पॅनिश गव्हर्नरच्या कामाचा एक भाग होता. धर्मातराला विरोध करणाऱ्या आदिवासींची स्पॅनिश लोक सरसकट कत्तल करू लागले तसे आदिवासीसुद्धा स्पॅनिश लोक आणि धर्मप्रचारक पाद्री यांच्यावर हल्ले करून त्यांना ठार मारू लागले. स्पॅनिश लोकांचा छळवाद, गुलामगिरीचे हलाखीचे जीवन आणि साथीचे रोग यामुळे अनेक आदिवासी मृत्यू पावले वा दुसऱ्या बेटांवर पळून गेले. या वसाहतीत स्थायिक होण्यासाठी स्पॅनिश लोकही विशेष रस घेत नसल्याने अठराव्या शतकाच्या अखेरीस त्रिनिदादची लोकसंख्या अगदीच कमी झाली.

पुढे काही फ्रेंच लोकांनी त्रिनिदादच्या निर्जन बेटावर स्थलांतर करून तिथे शेती व अन्य व्यवसाय करण्याचा परवाना स्पॅनिश राजाकडून मिळविला. स्पेनच्या राजाने हा परवाना फक्त रोमन कॅथलिक लोकांसाठी देऊन त्यांना प्रोत्साहन म्हणून करमाफी आणि दहा एकर जमीनही दिली. १७८३ मध्ये हा परवाना मिळविल्यानंतर मोठमोठे फ्रेंच मळेवाले या बेटावर येऊन स्थायिक झालेच पण त्यांच्या बरोबर मोठय़ा संख्येने त्यांचे आफ्रिकन गुलाम आले. त्यांच्यामागोमाग शेजारच्या बेटांवरूनही अनेक मुक्त गुलाम त्रिनिदादमध्ये येऊन स्थायिक झाले. या नवीन फ्रेंच मळेवाल्यांनी आफ्रिकन गुलाम आणि मजुरांच्या साह्यने ऊस आणि कोकोची मोठय़ा प्रमाणात लागवड केली. पुढच्या पाच वर्षांत या बेटावरची लोकसंख्या अनपेक्षितपणे वाढली. १७९७ साली त्रिनिदादच्या एकूण १८००० लोकसंख्येपैकी १५००० तर केवळ आफ्रिकन गुलाम आणि आफ्रिकन मुक्त गुलाम होते. स्पॅनिश राजाची कॅरिबियन प्रदेशात न्यू स्पेन ही वसाहत होती. मेक्सिको, मध्य अमेरिकेतील काही प्रदेशांच्या मिळून बनलेल्या या वसाहतीतच त्रिनिदादच्या वसाहतीचा समावेश होता. या ‘न्यू स्पेन’चे प्रशासन स्पॅनिश राजाने नेमलेल्या गव्हर्नरकडे होते

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:01 am

Web Title: trinidad in new spain spanish in trinidad history of trinidad zws 70
Next Stories
1 कुतूहल – वैशिष्टय़पूर्ण हेरॉन त्रिकोण
2 नवदेशांचा उदयास्त : त्रिनिदाद-टोबॅगो
3 नवदेशांचा उदयास्त : सध्याचा स्वतंत्र जमैका
Just Now!
X