04 June 2020

News Flash

कुतूहल : टर्किश टॉवेल- १

टॉवेल म्हटला की एक प्रकार टर्किश टॉवेलचा लक्षात येतो. सर्वाना ज्ञात असलेला हा कापडय़ाचा प्रकार निर्माण कसा होतो, त्याची वैशिष्टय़े कोणती हे जाणून घेणे सर्वाना

| September 2, 2015 02:24 am

टॉवेल म्हटला की एक प्रकार टर्किश टॉवेलचा लक्षात येतो. सर्वाना ज्ञात असलेला हा कापडय़ाचा प्रकार निर्माण कसा होतो, त्याची वैशिष्टय़े कोणती हे जाणून घेणे सर्वाना आवडेल.
कापडामधील एक प्रकार आहे दुहेरी कापड. आताचा प्रचलित शब्द वापरायचा तर रिव्हर्सबिल म्हणजे दोन्ही बाजूंनी वापरता येणारे कापड. पायमोजे, चादरी, टॉवेल इत्यादींमध्ये याचा वापर आढळतो. बहुसंख्य वेळा हे कापड दुहेरी कापडच असते. यातलाच एक प्रकार म्हणजे टर्किश कापड किंवा आपण त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात टॉवेल म्हणून करतो म्हणून टर्किश टॉवेल.
टर्किश टॉवेल म्हणजे दुहेरी कापड तयार करताना दोन ताणे आणि एक बाणा यांचा वापर केला जातो. एक ताणा आणि बाणा वापरून साध्या विणीचे आधारभूत कापड तयार होते. दुसऱ्या ताण्याचे बीम पहिल्या ताण्याच्या (आधारभूत कापडासाठी वापरलेल्या) बीमच्या वर ठेवलेले असते. दुसऱ्या बीमचा ताणा एकेरी किंवा दुहेरी सुताचा असतो. टर्किश टॉवेलच्या जाडीनुसार ते ठरविले जाते. शिवाय दुसऱ्या बीमासाठी वापरलेले सूत कमी पिळाचे असते. या दुसऱ्या ताण्याच्या सुतापासून पहिल्या ताण्यापासून तयार झालेल्या कापडाच्या पृष्ठभागावर टाके तयार केले जातात. हे सूत कमी पिळाचे म्हणून नरम असते, त्यामुळे त्याची पाणी शोषून घ्यायची क्षमता चांगली असते. याच कारणाने या कापडाचा वापर टॉवेलसाठी प्राधान्याने केला जातो. पाणी शोषून घेण्याची गरज लक्षात घेऊन इथे कापसाच्या सुताला प्राधान्य दिले जाते. आणि त्यामुळेच बहुतेक सर्व प्रकारचे टर्किश टॉवेल/ नॅपकीन सुतीच असतात. त्या सुताची मजबुती हा एक गुणधर्म इथे वापरण्यासाठी लक्षात घेतला जातो. टर्किश टॉवेलमध्ये टाक्यांच्या किंवा तुऱ्यांच्या स्वरूपात सुताचे लांब मोकळे तरंग आधारभूत कापडाच्या पृष्ठभागावर असल्यामुळे पाणी लवकर शोषून घेण्याची क्षमता या कापडात असते.
घरगुती वापरासाठीचे टर्किश टॉवेल सुती असले तरी खेळाडूंसाठी वापरायच्या टॉवेलमध्ये खरखरीत स्पर्श निर्माण करण्यासाठी लिननचा वापर करतात. तसेच टर्किश टॉवेलसाठी व्हिस्कॉस रेयॉनचा वापरही केला जातो, पण ते टॉवेल सुती टॉवेलएवढे टिकत मात्र नाहीत.
ल्ल दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर –  सिरोहीचा राज्यकारभार
सिरोही राज्यकर्त्यांनी इ.स. १८१७ मध्ये कंपनी सरकारशी संरक्षणात्मक करार केल्यामुळे सिरोही हे एक ब्रिटिशअंकित संस्थान बनले. या संस्थानाच्या पुढील शासकांपकी महाराव केशरीसिंह याची इ.स. १८७५ ते १९२० अशी कारकीर्द संस्मरणीय झाली. या काळात राज्याने आमूलाग्र प्रगती केली. केशरीसिंहाने प्रशासनाचा मूळ ढाचा बदलून आधुनिकीकरण केले, दवाखाने, शाळा, रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी सुविधा निर्माण केल्या. केशरीसिंहाचा मुलगा महाराव सरूपसिंहने गादीवर आल्यावर प्रशासनात जनतेचा सहभाग सुरू केला. राज्य विधिमंडळ पद्धतीने एक सल्लागार मंडळ काम करू लागले. वडील केशरीसिंहांनी सुरू केलेली रेल्वेसेवा, रस्ते यात सरूपने वाढ करून विमानसेवा सुरू केली. त्याने गावागावात ग्रामपंचायत स्थापन करून सिरोहीत उच्च न्यायालय सुरू केले.
एवढा कार्यक्षम, राज्यकर्ता असूनही सरूपसिंहाच्या मृत्यूनंतर मोठे वादळ उठले. त्याने त्याच्या मृत्युपत्रात लिहून ठेवले होते की, ‘आपण १९२७ साली इंदोरमध्ये गुप्तपणे इस्लाम धर्म स्वीकारून १९३१ साली एका मुस्लीम स्त्रीशी विवाह केला आहे. मृत्यूनंतर माझे दहन न करता मुस्लीम पद्धतीने दफन करावे.’ सरूपसिंह निपुत्रिक असून त्याने तेजरामसिंह या तीन वर्षांच्या मुलाला दत्तक घेतले होते. त्याच्या दत्तक पुत्राला राज्याचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता अजून मिळाली नव्हती. व्हाईसरॉयने मग हे दत्तकविधान तातडीने मंजूर करून १९४६ मध्ये संस्थानाच्या कारभारासाठी प्रशासकीय मंडळ नेमले. पुढच्याच वर्षी, १९४७ साली या मंडळाने स्वतंत्र भारतात सिरोही संस्थान विलीन करण्याचा निर्णय घेतला. भारतीय स्वातंत्र्यानंतर सरूपसिंहाची कबर फोडून त्याच्या पुढच्या वंशजाने त्याच्या अवशेषांचे हिंदू पद्धतीने दहन केले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2015 2:24 am

Web Title: turkish bath towels
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल – डेनिम-जीन्स (भाग-२)
2 संस्थान बिकानेर
3 संबलपुरी साडी
Just Now!
X