20 September 2020

News Flash

कुतूहल : सजीवांमधील संदेशन

पाण्यातील प्रदूषके कमी करण्यासाठी ‘जैवतवंग’ (बायोफिल्म) वापरली जाते.

संवेदनशीलता व प्रतिसाद क्षमता हे सजीवांचे जीवनावश्यक गुणधर्म आहेत. भवताली होणाऱ्या बदलांना सुयोग्य प्रतिसाद देणे जीवनसंग्रामात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते. यात परस्परांशी संपर्काचाही समावेश होतो. तुलनेने मागास व एकपेशीय जीव तसेच बहुपेशीयांच्या उतींमधील पेशी रसायनांद्वारा संदेशन साधतात. या प्रकारे परस्पर सहकार्याने वाढणारे सूक्ष्म जीव स्वजातीय आणि विजातीय स्पर्धक व साहाय्यक प्रजातींना रासायनिक संकेत प्रसृत करून आकृष्ट करतात आणि त्यांच्या संख्येचे नियंत्रणही करतात. संवाद साधणारे हे रेणू अशा सजीवांच्या चयापचय क्रियेदरम्यान निर्माण होणारे दुय्यम व अनावश्यक रेणू असल्याने त्यांचा वापर संदेशनासाठी करणे किफायतशीर ठरते. ‘पेनिसिलियम’सारख्या प्रजाती स्पर्धक जिवाणूंना दूर करणारी रसायने स्रवतात, ज्यांचा वापर आपण प्रतिजैविक (अ‍ॅण्टिबायोटिक) म्हणून करतो. पाण्यातील प्रदूषके कमी करण्यासाठी ‘जैवतवंग’ (बायोफिल्म) वापरली जाते. अतिसूक्ष्म कणांची (नॅनो पार्टिकल्स) निर्मिती करण्यासाठीदेखील रासायनिक संकेतांच्या उपयोजनाने विशिष्ट सूक्ष्म जीव आकृष्ट व गुणित करण्याचे तंत्रज्ञान गेल्या काही दशकांत विकसित झाले आहे.

जमिनीतील तंतुमुळांच्या भवताली विवक्षित, सहजीवी सूक्ष्म जीव आमंत्रित करण्यासाठी वनस्पती रासायनिक संकेत वापरतात. वनस्पतींना नत्र, फॉस्फेट, पोटॅशियम यांसारखी पोषके मिळवून देणारे सहजीवी जिवाणू, तसेच अंतस्थित (एण्डोट्रॉफिक) वा बाह्य़स्थित (एक्झोट्रॉफिक) संकवके (मायकोराइझा) यांना आकृष्ट करणे व नकोशा कवक-जिवाणू प्रजातींना दूर ठेवण्यासाठीसुद्धा रासायनिक संकेतांचा वापर वनस्पती करीत असतात.

वनस्पती सेंद्रिय उद्गाती संयुगे (व्होलाटाइल ऑरगॅनिक कम्पाऊंड्स) वापरून परस्परांत संवाद साधतात, असे प्रतिपादन शुल्झ व बाल्डवीन या शास्त्रज्ञांनी केले. ते तब्बल दशकभरातील प्रयोगांद्वारे बाँबिकोव्हा यांनी सिद्ध केले. होलोपेनेन हा संशोधक म्हणतो की, विविध सेंद्रिय उद्गाती संयुगांना शब्दांसारखे वापरत सपुष्प वनस्पती वाक्ये तयार करून संदेशन साधतात.

परागीभवन व बियांचे विखुरण कीटक, प्राणी वा पक्षी यांच्याकडून करवून घेण्यासाठी वनस्पती फुले व फळे यांमध्ये विशिष्ट उद्गाती रसायने वापरतात. ‘रॅफ्लेशिया’ हे हिमालयातील आकाराने जगातील सर्वात मोठे असणारे फूल सडक्या मांसासारखा गंध सोडीत माशांना आकृष्ट करते. काही ‘ऑर्किड’ पुष्पे विशिष्ट कीटकांच्या मदावर असलेल्या मादीसारखाच गंध पसरवीत नरांना परागणासाठी आमंत्रित करतात. एकंदरीत रासायनिक संकेतांचा संदेशनांसाठीचा वापर सूक्ष्म जीव व वनस्पती पूर्वापार करीत आल्या आहेत.

– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 12:40 am

Web Title: volatile organic compound penicillium species zws 70
Next Stories
1 मनोवेध : व्यक्ती तितक्या प्रकृती
2 मनोवेध : वेगळेपणाचा आदर
3 कुतूहल : संगीत.. पक्ष्यांचे!
Just Now!
X