‘मी कुठे आहे?’ हा प्रश्न दर्यावर्दी पुरातन काळापासून विचारत फिरत असतात. सुरुवातीला ग्रहताऱ्यांच्या मदतीनं आणि नंतर रेडिओ लहरींच्या आधारानं हे काम केलं जात होतं. हल्ली उपग्रहांच्या मदतीने फक्त दर्यावर्दी आणि वैमानिकच नाही तर ज्या कोणाच्या खिशात स्मार्ट फोन आहे, तो जी.पी.एस.च्या मदतीनं आपलं निश्चित स्थान शोधू शकतो.

या दरम्यान सुमारे सहा-सात दशकांपूर्वी शास्त्रज्ञांनी एक अशी पद्धत शोधून काढली की,  जी ग्रह-तारे, रेडिओ केंद्रे, उपग्रह अशा कोणत्याही बाह्य माहिती स्रोतांच्या मदतीशिवाय आपला मार्ग शोधू शकते. या पद्धतीचं नाव आहे ‘इनíशयल नॅव्हिगेशन’ म्हणजेच जडत्वावर आधारित नौवहन.

या पद्धतीचा सर्वात मोठा  फायदा असा की ढगांमुळे, रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणातल्या अडथळ्यांमुळे किंवा विघातक शक्तींनी आणलेल्या विघ्नांमुळे (जॅमिंग) इनशयल नॅव्हिगेशनमध्ये  कोणताही व्यत्यय येत नाही.

न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार एखाद्या वस्तूचा वेग किंवा दिशा बदलण्यासाठी त्या वस्तूवर बाह्यबलाचा वापर करावा लागतो. समजा, एक जहाज एका जागी स्थिर आहे. जेव्हा ते जहाज आपली जागा सोडून एखाद्या दिशेने (उत्तर, वायव्य इ.) प्रवास सुरू करते, तेव्हा त्याचा वेग शून्यापासून वाढत जाऊन एखाद्या विशिष्ट पातळीवर जाऊन स्थिर होतो. या वेगाने ते काही तास किंवा दिवस प्रवास करते. त्यानंतर ते अनेक वेळा वेग आणि दिशा बदलते. वेग बदलताना जे त्वरण (अ‍ॅक्सिलरेशन) होतं, त्याचा जर अचूक हिशेब ठेवला आणि किती वेगाने कोणत्या दिशेने किती वेळ प्रवास केला याचं गणित मांडलं; तर दर्यावर्दीला त्याच्या ‘मी कुठे?’ या प्रश्नाचं उत्तर मिळतं. हे त्वरण मोजण्याचं काम ‘अ‍ॅक्सिलरोमीटर’ हे उपकरण करतं. पूर्वी या कामासाठी एक जड वजन िस्प्रग्जना ताण देऊन एका ठिकाणी स्थिर ठेवलेलं असे. त्वरणाचं मोजमाप या स्प्रिंग्जमधल्या ताणावरून करता येत असे.

हल्ली हेच काम इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सिलरोमीटरच्या मदतीने केलं जातं, त्यामुळे त्याचा आकार आणि वजन अतिशय सुटसुटीत झालंय. त्यामुळे ते आता नौदलाची जहाजं, विमानं एवढंच नाही तर क्षेपणास्त्रं आणि स्पेस शटलमध्येही वापरतात.

कॅ. सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

अली सरदार जाफ़री : सन्मान

‘नई दुनिया को सलाम’ हे एकूण आठ प्रकरणांत दीर्घकाव्य लिहिले आहे. या संदर्भात सरदार जाफरी म्हणतात, ‘जगाच्या इतिहासात ‘मानवा’चा पराभव झाला आहे, असा कालखंड कधीच निर्माण झालेला नाही. व्यक्ती व वर्ग यांचा पराभव होत आला आहे आणि तो होत राहीलही. पण ‘मानव’ हा अपराजेय आहे. ती माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. तो साहित्य आणि कला यांचा अनादि विषय आहे असे मी मानतो. सर्वात अधिक सन्माननीय सुंदर ‘मानवच’ आहे’- या दीर्घकाव्याने उर्दू साहित्यात मोलाची भर घातली आहे.

या कवितेने मुक्तछंदाचे रूप धारण करून स्वातंत्र्यलढय़ाचा ओजस्वी इतिहास, जुलूम, अत्याचाराचे चित्रण करीत, स्वातंत्र्याची नवी पहाट होणार असल्याचा आशावादही व्यक्त केला आहे. या काव्याचा विषयही नवा आहे आणि तंत्रही नवे आहे. त्यांनी आपल्या या कवितेत घटनांच्या ऐवजी घटनांमधून निर्माण होणाऱ्या भावभावना, प्रभाव व जाणिवा व्यक्त केल्या आहेत.

संकेताऐवजी विस्तार व स्पष्टीकरण यांचा उपयोग केला आहे. या रचनावैशिष्टय़ांमुळे या रूपक काव्यातील पात्रांची संख्याही लहान-कमी ठेवली आहे. नवीन तंत्र आणि शेर या काव्यप्रकाराच्या वैशिष्टय़ांमुळे ‘नयी दुनिया को सलाम’ला उर्दू साहित्यात एक ऐतिहासिक खास स्थान प्राप्त झाले आहे.

अशा या सजग, क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या कवीला १९६७ मध्ये ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश उर्दू अकादमी पुरस्कार, भोपाळ उर्दू अकादमी पुरस्कार, संत ज्ञानेश्वर पुरस्कार, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, इक्बाल सन्मान, फैज अहमद फैज अ‍ॅवॉर्ड, अलिगढ विश्वविद्यालयातर्फे डी.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे आणि १९९७ मध्ये ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.

१९९९ मध्ये त्यावेळचे भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे जेव्हा बसने लाहोरला भेट देण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी अली सरदार जाफरी यांचे ‘सरहद’ आणि ‘मेरा सफर’ हे दोन्ही काव्यसंग्रह बरोबर घेतले होते. त्या प्रवासासाठी जाफरींनाही निमंत्रण होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते लाहोरला जाऊ शकले नाहीत. पण या भेटीच्या वेळी पंतप्रधान वाजपेयी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना राष्ट्रीय भेट म्हणून सरदार जाफरींचा ‘सरहद’ हा काव्यसंग्रह भेट म्हणून दिला. ही जाफरी यांच्या लेखनाला फार मोठी दाद होती. ही एक विलक्षण महत्त्वाची अशी ऐतिहासिक घटना घडली.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com