News Flash

विश्वाचा विस्तार

आपलं विश्व सतत प्रसरण पावत आहे.

आपलं विश्व सतत प्रसरण पावत आहे. विश्वाचा जन्म महाविस्फोटातून झाला हे आता जवळजवळ सर्वानीच मान्य केलं आहे. कोणत्याही स्फोटानंतर जशा त्यातल्या वस्तू एकमेकांपासून दूरदूर फेकल्या जातात त्याचप्रमाणे महाविस्फोटातून उदय पावलेल्या विश्वातल्या दीíघका एकमेकींपासून दूरदूर जात आहेत.

म्हणजे बघा, एका फुग्यावर जर तुम्ही काही ठिपके काढलेत, रांगोळीसारखे, आणि तो फुगा फुगवायला सुरुवात केलीत तर काय होईल? त्या ठिपक्यांमधलं अंतर वाढत जाईल. आपल्या विश्वाचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळं विश्व प्रसरण पावत आहे. याविषयी आता शंका राहिलेली नाही. प्रश्न आहे तो ते किती वेगानं प्रसरण पावत आहे हा.

खरं तर त्याचं उत्तर ज्यानं सर्वप्रथम विश्वाचं प्रसरण आपल्या नजरेला आणून दिलं त्या एडविन हबलनंच दिलं होतं. त्याच्या नावानं आता ओळखला जाणारा हबल स्थिरांक हाच विश्वाच्या प्रसरणाच्या वेगाचं मोजमाप होता. अर्थात त्यानं शोधलेलं उत्तर चूक होतं हे आता ध्यानात आलं आहे. पण त्याबद्दल हबलला दोष लावण्यात अर्थ नाही. कारण त्यानं ते मोजमाप केलं त्यावेळी उपलब्ध असलेलं तंत्रज्ञानच तोकडं होतं.

पण त्यानंतर वैज्ञानिकांनी अनेक अत्याधुनिक आणि अधिक अचूक प्रणाली शोधून काढल्या आहेत. महाविस्फोटाच्या वेळी जो आगडोंब उसळला तो अजून पूर्णपणे विझलेला नाही. त्याचे निखारे अजूनही धगधगत आहेत आणि मायक्रोवेव्ह विकिरणाच्या रूपात ते आपली उपस्थिती जाणवून देत आहेत. त्याचा अभ्यास करून काही जण हा वेग मोजतात. इतर काही जण प्रकाशाचे स्पंद उत्सर्जति करणाऱ्या सेफाईड ताऱ्यांच्या प्रकाशाचा वेध घेतात, तर इतर काही एखादा तारा जेव्हा मृत पावतो त्यावेळी होणाऱ्या त्याच्या विस्फोटातून उसळणाऱ्या प्रकाशडोंबाकडे नजर लावतात.

त्यात गंमत अशी की दूर ताऱ्यांकडून येणारा प्रकाश अवकाशात जिथं आकाशगोलांची गर्दी आहे, तिथून येताना जास्त वेळ घेतो तर तुरळक वस्ती असलेल्या भागातून त्याचा प्रवास वेगवान होतो. पृथ्वीपर्यंत पोचायला त्यांना लागणाऱ्या वेळातल्या फरकावरून हे मोजमाप करता येतं. यंदाच्या जानेवारी महिन्यात एक ताजं मोजमाप केलं गेलं. होलीकाऊ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका बहुद्देशीय प्रकल्पानं केलेल्या मोजमापानुसार हा वेग ७१.९ किलोमीटर दर सेकंद दर मेगापास्रेक (एक मेगापास्रेक म्हणजे तेहतीस लाख प्रकाशर्वष) असा आहे. जबरदस्तच!

-डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

एम. टी. वासुदेवन नायर- कादंबरी लेखन

१९५४ मध्ये विद्यार्थिदशेत असतानाच नायर यांची पहिली कादंबरी ‘नालुकेट्टु’ प्रसिद्ध झाली आणि पदार्पणातच तिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘कालम्’ (१९६९) या कादंबरीसाठीही त्यांना १९७० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आतापर्यंत त्यांच्या एकूण आठ कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांची महान साहित्यकृती ‘रण्टामूषम्’ (दुसरी संधी) ही कादंबरी १९८४ ला प्रकाशित झाली. या पौराणिक कादंबरीतील मुख्य पात्र ‘भीम’ योग्यता असूनही सन्मानापासून वंचित राहिलेला आहे. ही मनोव्यथा आजच्या माणसाचीही आहे, असे चित्रित केले आहे.  दुसरा पांडव- भीम हा या कादंबरीचा नायक आहे. भीमाचे चित्रण केवळ महापराक्रमी वीर, धीरगंभीर, शक्तिशाली नायक एवढेच नसून, त्याच्या मनातील अथांग करुणेचे, मृदु हृदयाचे चित्र त्यांनी उभे केले आहे. त्यासाठी लेखकाने दीर्घकाळ संशोधन केले. १९५४ मध्ये ‘नालुकेट्टु ही नायर यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. यात केरळमधील नायर समाजात शेवटाला आलेल्या मातृसत्तात्मक समाजव्यवस्थेचे चित्रण आहे. यातील अपमान, आक्रोश आणि बदला घेण्याची भावना यांचे सजीव चित्रण आहे; जे ग्रामीण मध्यमवर्गातील तरुणांच्या अनुभवाच्या अत्यंत जवळचे होते. त्यामुळे ही कादंबरी विलक्षण लोकप्रिय झाली.

‘नालुकेट्टु’ ही कादंबरी जिथे संपते तिथेच त्यांची दुसरी कादंबरी ‘असुरवित्तु’ (१९६२) सुरू होते. पहिल्या कादंबरीत अम्पुण्णि आपल्या पूर्वजांचं घर उद्ध्वस्त करू इच्छित होता. दुसऱ्या कादंबरीत गोविंदकुट्टी हा प्रतिनायक आपले वडील, कुटुंब आणि जातीतील लोक यांना सोडून जातो आणि एक प्रकारे पूर्ण व्यवस्थाच उद्ध्वस्त करतो. इस्लाम धर्म स्वीकारूनही त्याला मुक्ती मिळत नाही, तरीही मनाने तो एकाकीच राहतो. त्रस्त होतो. तो स्वत:ची ओळख पटल्याचा दावा करतो, इतिहासाचा धांडोळा घेतो. पण आपली ओळख आपल्याच पकडीच्या बाहेर असल्याचे त्याला जाणवते. आपले पूर्ण जीवनच हा एक अर्थहीन आवेश होता हे त्याला जाणवते.

‘मंजू’ (धुके) या कादंबरीतही स्त्री-पुरुषांमध्ये असलेली एकाकीपणाची भावना लेखकाने चित्रित केली आहे. विमलादेवी या तरुणीच्या प्रतारणेचे, व्यथा-वेदनांचे, आपले मानसिक अस्वास्थ्य दूर होईल या ओढीने प्रतीक्षा करण्याचे चित्रण यात केले आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 3:08 am

Web Title: what is the big bang theory
Next Stories
1 ताऱ्यांचं वजन
2 डोक्याचं वजन
3 अणूचं वजन
Just Now!
X