श्रुती पानसे contact@shrutipanse.com

ज्या मुलांना अक्षरांचं वाचन करण्यात काही समस्या असतात, त्यांच्यामध्ये डिस्लेक्सिया ही अध्ययन अक्षमता असते, असं दिसून येतं. त्याचप्रमाणे ज्या मुलांना लेखनामध्ये समस्या असतात त्यांच्यामध्ये डिसग्राफिया ही अध्ययन अक्षमता असते, असं संशोधकांच्या लक्षात आलं आहे.

काही मुलांना अक्षरं लिहिता का येत नाहीत, याचं मुख्य कारण अजूनही समजलेलं नाही. परंतु आनुवंशिकता, मेंदूच्या दुखापतीमुळे किंवा काही आघात झाल्यामुळे  काहींना लिहिता येत नाही. अक्षर काढण्यासाठी अनेक क्षमता आवश्यक असतात. त्यात प्रामुख्याने दृश्य-अवकाशीय क्षमता आणि हस्त – नेत्र समन्वय साधता येण्याची गरज असते. जर या दोन गोष्टींचा अभाव मुलांमध्ये असेल, तर त्याला लेखन अक्षमता आहे असं म्हटलं जातं.

अशी मुलं अक्षर काढण्याचा प्रयत्न करतात, पण ती अनेकदा उलटी काढली जातात. किंवा दोन अक्षरांमध्ये वा शब्दांमध्ये खूपच जास्त अंतर असतं. तर काही वेळेला एकावर एक शब्द लिहिले जातात. अक्षरं तिरकी, काही लहान- काही मोठी येतात. कधी खूप वर, कधी खूप खाली अशी अक्षरं काढली जातात. विरामचिन्हं कशी वापरायची, यात मुलांचा गोंधळ उडतो.  खूप वेगळ्या पद्धतीनं, ओळखू येणार नाही असं अक्षर काढलं जातं. काही मुलं पेन किंवा पेन्सिल वेगळ्या पद्धतीनं धरतात; ती कशी धरायची, हे त्यांना समजत नाही आणि जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्यांना ते करायचं नसतं. कारण कदाचित विशिष्ट पद्धतीनं पेन धरून त्यांचा हात दुखतो.

सुरुवातीच्या काळात सगळीच मुलं लिहायला शिकत असतात तेव्हा अशा अडचणी येतात. मात्र काही जणांच्या बाबतीत समस्या निर्माण होतात असं या क्षेत्रातल्या अभ्यासकांचं मत आहे.

मात्र, अशा मुलांना कधीच लिहिता येणार नाही असं नसतं. योग्य पद्धतीनं शांतपणे सुरुवातीला खूप मोठी अक्षरं काढली, त्यांना योग्य अवकाश दिला, तर त्या अक्षरांची प्रतिमा व्यवस्थितरीत्या मेंदूमध्ये तयार झाली की ही मुलं लिहू शकतात. त्याचबरोबर हस्त –  नेत्र समन्वयाच्या वेगळ्या कृती अथवा खेळ घेतले, तर मुलं योग्य पद्धतीनं लिहू शकतात.