शेती म्हटले म्हणजे शहरापासून दूर स्वच्छ, शुद्ध व मोकळ्या हवेतील व्यवसाय असे साहजिकपणे वाटते. शेतीच्या चारी बाजूंना झाडी व हिरवाई असल्यामुळे प्राणवायूची मुबलकता असते. कार्बनडायॉक्साइड वायू मोठय़ा प्रमाणात शोषला जात असल्यामुळे त्याचे हवेतील प्रमाण मर्यादेबाहेर वाढत नाही. हवेत आद्र्रता निर्माण होत असल्याने सुखद गारवा असतो. अशा आल्हाददायक वातावरणात शारीरिक श्रम करून थकवा फारसा येत नाही. उलट असे काम एक प्रकारचा व्यायामच ठरते.
मात्र तरीही शेतीत ज्ञसनसंस्थेचे आजार होण्याची शक्यता असते. विशेषत: धान्य साठवण्याचे गोदाम बंदिस्त असते. तिथे खेळती हवा कमी असते. आत पंखे नसतात. धान्याचे कण, धान्यावर चिकटलेले धूलिकण, तंतू, बुरशी, काही जिवाणू हवेत उडत असतात. तंतूंमुळे ज्ञासनलिकेच्या आतील स्तराला चरे उठतात व जखमा होतात. तसेच त्वचेलाही चरे पडतात. त्वचेत तंतू रुतून बसतात व त्यामुळे खाज येऊन त्वचारोग होतो. गोदामात मारलेल्या कीटकनाशकांशी संपर्क येऊन अधिहर्षता (अ‍ॅलर्जी) निर्माण होऊन ज्ञसनसंस्थेचे, त्वचेचे संसर्गजन्य रोग होतात व दुष्परिणाम दिसू लागतात.
धान्य हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ज्ञसनसंस्थेचे रोग जास्त आढळतात. झोडपणी करताना धान्यावरचे कण हवेतून ज्ञासनलिकेत जातात. नुसत्या झोडपण्याच्या ठिकाणच्या जमिनीवरची तंतुमय धूळ असते असे नाही तर धान्याला चिकटलेल्या व टरफलाला लागलेल्या धूलिकणांमुळेही त्रास होतो. धान्य उन्हात संपूर्ण न वाळवता साठवले तर त्यातील काही रसायनांचे बाष्पीभवन होते, धान्य तापते व त्याचा भुगा होतो. धान्याच्या वेष्टनामधून हे कण बाहेर पडतात. धान्याला लागलेल्या टोच व अन्य कीटकांनी धान्य पोखरून खाल्ल्यावर उरलेल्या टरफलांचे कण/भुगा ज्ञासावाटे फुफ्फुसात जातो. घशात हे कण अडकल्यामुळे घसा कोरडा होतो व खोकला होतो. ज्ञासनलिकेतही हे कण चिकटतात. त्यामुळे कोरडा खोकला सतत होतो. डोळे लाल होऊन त्यातून सारखे पाणी येते.
-डॉ. शशिकांत प्रधान , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..   –    ज्येष्ठ अनुभव
मी शक्यतोवर बस किंवा आगगाडीने प्रवास करतो. मुंबईतही सकाळी सात-साडेसातला गर्दी नसते. त्या दिवशी मंगळवार होता आणि म्हणून सिद्धिविनायकाचा दिवस आणि बस बऱ्यापैकी भरलेली होती. हा विघ्नहर्ता नक्कीच; परंतु त्या दिवशी तो सुखकर्ता नसतो. स्त्रियांच्या आरक्षित जागा भरलेल्या, कारण त्या जास्त धार्मिक. तरी दोन सिंगल सिटा रिकाम्या होत्या. पुरुषांच्या एका रिकाम्या बाकडय़ावर एक जरा विशाल स्त्री बसली होती. कारण ती रिकामी सीट तिला पुरली नसती. तिच्या हातात एक मोठी पिशवी होती आणि तिच्या पर्समधला भ्रमणध्वनी खणाणत होता. स्त्रियांच्या कोठल्याही प्रकारच्या कपडय़ांना खिसे नसतात. अपवाद एकच तो म्हणजे जीन्सचा; पण त्या एवढय़ा घट्ट असतात की मोबाइल काढायचा झाला तर त्यांना उठून उभे राहावे लागते. तर खणाणणारा मोबाइल पर्समधून काढणे समुद्रमंथनाहून अवघड, कारण पर्सला मात्र अनेक खिसे असतात. मोबाइल काढण्याच्या नादात अनेक वस्तू बाहेर पडल्या, त्या ती उचलत होती आणि त्यामुळे बरीच जागा तिने व्यापली होती. तेव्हा तिच्या शेजारची माझी आधीपासूनची सीट मी सोडली आणि नाइलाजाने ज्येष्ठ नागरिकांच्या बाकडय़ाकडे गेलो, तर तिथे कॉलेजला निघालेल्या दोन पोरी कॉलेजविश्वाबद्दल अपरिमित बोलत होत्या. मी शेजारी उभा राहून एकदा-दोनदा खाकरलो, तेव्हा माझ्याकडे कपाळाला आठय़ा पाडून म्हणाल्या, what is your problem?
तेवढय़ात कंडक्टर आला आणि म्हणाला, काका काय  Problem  केलात? आजोबांच्या ऐवजी काका म्हणाला, हे सुदैव पण मी Problem केला आहे हा निष्कर्ष हल्लीच्या स्त्रीप्रधान संस्कृतीला साजेसा. मग त्या दोघी उठल्या आणि एक म्हणाली, चांगले Fit  तर दिसता! दवाखान्यात पोहोचलो तेव्हा आठ वाजताचा पहिला रुग्ण आत आला. पहिल्यांदा नवरा आला, मला बघून चपापला आणि लगेचच बाहेर पडला, तेव्हा बंद होणारे दार बायकोवर आणि तिच्या कडेवरच्या मुलावर आदळायचे जेमतेम चुकले. मग परत आला आणि म्हणाला, तुम्ही आमच्या बसमध्ये होतात. तुम्ही एवढे सीनिअर डॉक्टर मग बस का? बायकोच्या शेजारीच एक मोठा मुलगा होता. त्याला बायको म्हणाली, बघ आजोबा एवढे मोठे तरी बसने जातात आणि तू Taxi Taxi  करतोस. तो पुरुष समोर बसला आणि म्हणाला, तुमचे वय काय? नेहमी लोक म्हणतात तसे तुम्हाला किती वाटते, असा प्रश्न मी टाळला. ९० वगैरे म्हणाला असता तर आफत झाली असती. मी ७५ असे सांगितल्यावर म्हणाला, तुम्ही अजून Operation  करता? मनात आले म्हणावे, मग काय करायला इथे बसलो आहे? असो.
असे हे ज्येष्ठ अनुभव. उद्या काही आधुनिक संकेताबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture and respiratory system diseases
First published on: 29-11-2013 at 01:45 IST