मूळच्या अफगाणिस्तानात राहणारे पठाण जमातीतील लोक योद्धे म्हणून लोधी आणि सुरी या अफगाण सत्ताधाऱ्यांच्या कारकीर्दीत मोठय़ा संख्येने बाराव्या आणि सोळाव्या शतकात भारतात आले आणि पुढे भारतीय प्रदेशांमध्येच स्थायिक झाले. या पठाणांच्या पुढच्या वंशजांची राजकारण, व्यवसाय, क्रीडा, संगीत, चित्रपटात वगरे सर्वच क्षेत्रांमधील कामगिरी स्तिमित करणारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता सरोदवादनात जागतिक मापदंड बनलेले उस्ताद अमजद अली खान हेसुद्धा बंगश पठाण घराण्याचे आहेत. अमजद अलींचा जन्म ग्वाल्हेरातला, १९४५ सालचा. अमजद अलींना संगीत आणि विशेषत: सरोदवादन हे विरासतीत मिळालंय, त्यांच्या पूर्वीच्या सहा पिढय़ा ग्वाल्हेर दरबारच्या संगीतकारांच्या झाल्या. अमजद अली आणि त्यांचे सहा पिढय़ांचे पूर्वज हे संगीताच्या ‘सेनिया बंगश’ या घराण्याचे अध्वर्यू आणि सर्वच सरोदवादक होते. या पूर्वजांनीच इराणचे प्रसिद्ध लोकवाद्य ‘रबाब’ याच्यात भारतीय संगीताला अनुकूल होईल असे बदल वेळोवेळी करून आजचे सरोद हे वाद्य बनवलं आणि त्याचं ‘सरोद’ हे नावदेखील त्यांनीच ठेवलंय!

वडील हाफिज अली खान यांच्याकडून भारतीय अभिजात संगीत आणि सरोदवादनाचे प्राथमिक धडे घेतल्यावर ग्वाल्हेरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात अमजद अलींनी वयाच्या केवळ बाराव्या वर्षी आपले एकल सरोदवादन सादर केले. अमजद अलींची त्या लहान वयातली संगीताची जाण आणि लयकारी पाहून त्या कार्यक्रमातले उपस्थित दिग्गज संगीतज्ञसुद्धा थक्क झाले.

अमजद अलींचे मूळचे नाव मासूम अली खान. संगीतकार उस्ताद हाफिज अली खान आणि राहत जहान यांचे अमजद अली हे सातवे अपत्य. एका साधूने त्यांचे नाव बदलून अमजद केले. वडील हाफिज अली ग्वाल्हेरच्या दरबारातले प्रतिष्ठित विद्वान संगीततज्ज्ञ होते. १९५७ मध्ये त्यांना दिल्लीतील एका सांस्कृतिक संघटनेने दिल्लीत नियुक्त केल्यावर ते आपल्या कुटुंबासह दिल्लीत स्थायिक झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amjad ali khan
First published on: 18-06-2018 at 02:06 IST