अणुक्रमांक ३३ असलेले आवर्त सारणीतील चौथ्या आवर्तनातील, १५व्या गणातील हे मूलद्रव्य – आस्रेनिक. आस्रेनिक विषारी मूलद्रव्य म्हणून ओळखले जाते. धातूसदृश असलेल्या या मूलद्रव्याची अनेक अपरूपे आहेत, त्यातील राखाडी रंगाचे अपरूप औद्योगिक क्षेत्रात वापरले जाते. आस्रेनिक पूर्वीपासून म्हणजे अगदी ५००० वर्षांपूर्वीपासून मानवाला ज्ञात असलेले मूलद्रव्य आहे. इजिप्त, ग्रीक तसेच चिनी लोकांना आस्रेनिक ज्ञात असल्याची नोंद आढळते. चीनमध्ये भातशेतीमध्ये कीटकनाशक म्हणून आस्रेनिक उपयुक्त असल्याची नोंद आहे. कास्ययुगात कासे या संमिश्राला कठीणपणा आणण्यासाठी आस्रेनिक वापरत असत. व्हिक्टोरिया राणीच्या काळात आस्रेनिकचा वापर रंग गोरा करण्यासाठी केला गेला. अन्नामध्ये भेसळ म्हणून मिसळल्याने विषबाधा झाल्याची नोंदही या काळात आढळते. आस्रेनिक विषारी आहे हे सिद्ध होण्यापूर्वी रंगद्रव्य म्हणून तसेच डी.डी.टी.चा शोध लागेपर्यंत कीटकनाशक म्हणून त्याचा उपयोग होत असे. पॅरिस- ग्रीन आणि शील्स-ग्रीन ही आस्रेनिकची रंगद्रव्य मोठय़ा प्रमाणात वापरात होती. शिसे या धातूबरोबर संमिश्र म्हणून आस्रेनिक वापरले जाते. वाहनांमधील बॅटरीमध्ये मजबुतीसाठी शिसे आणि आस्रेनिकचे संमिश्र वापरतात. वाळवीपासून बचाव करण्यासाठी लाकडावर आस्रेनिकचा संरक्षक थर लावला जात असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आस्रेनिकचा वापर अर्धवाहक म्हणून तसेच एलसीडी स्क्रीनच्या काचेमध्ये केला जातो. याचप्रमाणे रंगहीन काच आणि विद्युत उपकरणांमध्येही आस्रेनिकचे ऑक्साइड वापरले जाते.

प्राचीन काळापासून वापरात असले तरी मूलद्रव्य म्हणून आस्रेनिकचा शोध इ.स. १२००मध्ये जर्मनीच्या ‘अ‍ॅलबर्ट्स मॅग्नस’ या शास्त्रज्ञाने लावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विषारी असलेले हे मूलद्रव्य काही जिवाणू चयापचय क्रियेमध्ये वापरतात. योग्य प्रमाणात वापर केला तरच औषधाचा फायदा होतो नाही तर तेही शरीराला घातक ठरू शकते. त्याचप्रमाणे विषारी असले तरी हेच आस्रेनिक योग्य प्रमाणात वापरल्यास मानवाला ते उपयोगी आहे. कर्करोगाच्या उपचारात आस्रेनिक वापरले जाते. शरीरातील विकरे (एंझाइम्स) सक्रिय करण्यासाठी आस्रेनिकचा उपयोग केला जातो. आस्रेनिक सेंद्रिय स्वरूपात कुक्कुटपालन व्यवसायात, पक्ष्यांच्या अन्नामध्ये रोगप्रतिबंधक आणि वजन वाढविण्यासाठी वापरले जाते.

वनस्पती पाण्यातून आस्रेनिक शोषतात. जमिनीतील पाण्यात आस्रेनिकचे प्रमाण जास्त असेल तर पाण्यातून विषबाधा होऊ शकते.

अनघा अमोल वक्टे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ 

rajeevsane@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arsenic chemical element
First published on: 30-05-2018 at 03:08 IST