डॉ. श्रुती पानसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन्मल्यापासून ते पहिल्या दोन वर्षांत आपण घरात बोलली जाणारी किमान एक भाषा पूर्णपणे बोलायला शिकतो. अगदी त्यातल्या व्याकरणासह, विशिष्ट उच्चारांसह आणि आवाजात चढ-उतार आणून! हळूहळू कुजबुज करणंही जमतं आणि वरच्या पट्टीतलं ओरडणं जमतं! ही सर्व प्रक्रिया केली ती आपल्या कानांनी आणि कानांवाटे मेंदूत पोचलेल्या ध्वनिलहरी आणि ऑडिटरी कॉर्टेक्सनी.

कान हे आपलं महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय, जे आपल्याला भाषा शिकवतं. जी भाषा आपण भरपूर ऐकतो, त्या भाषेचं आकलन चांगल्या पद्धतीने होतं. ज्या बाळांच्या घरामध्ये द्वैभाषिक – त्रभाषिक वातावरण आहे, त्यांच्या मेंदूची तर चंगळच. सहजपणे कानावर पडलेल्या या भाषा बाळाला पहिल्या दोन-तीन वर्षांत सहज बोलता येतात.

बाळांना नेहमीचे आवाज सरावाचे झालेले असतात. नवीन आवाज आले की बाळांचं लक्ष जातं. मोठं होताना मुलं टीव्हीवरच्या जाहिरातीही म्हणतात. घरातल्या माणसांकडून वारंवार उच्चारले जाणारे शब्द उचलतात. चांगल्या शब्दांबरोबर वाईट शब्द, अगदी शिव्या, भांडणात उच्चारले जाणारे नको ते शब्दही मुलं ऐकतात. लक्षात ठेवतात. आणि नको त्या वेळी उच्चारूनही दाखवतात. चार-पाच वर्षांपर्यंतची मुलं जे ऐकू येईल ते बोलतात, त्याचा अर्थ त्यांना कळलेला असेल असं काही सांगता येत नाही. मुलांच्या कानातून मेंदूतल्या ऑडिटरी कॉर्टेक्सकडे सर्व शब्द जाणारच आहेत. आपण जे बोलतो तेच सर्व मुलं लक्षात ठेवणार आणि बोलणार, हे लक्षात घेऊनच त्यांच्याशी बोलायला हवं.

माणूस समोर नसताना केवळ आवाजावरून आपण त्याच्या मनातल्या भावनांचा आवाज बांधत असतो. समोरची व्यक्ती आनंदात आहे, समाधानी आहे की रागात आहे, संतापात आहे, रागाच्या आवेगावर नियंत्रण ठेवून बोलत आहे, हे सर्व केवळ आवाजावरून दृश्य प्रतिमांची साथ नसतानाही कळू शकतं. या सर्व गोष्टी नकळतपणे घडतात, मात्र त्यामागे मोठी प्रणाली कार्यरत असते.

अनेक प्रश्नमंजूषा (क्विझ) कार्यक्रमांमध्ये केवळ प्रसिद्ध व्यक्तीचा आवाज ऐकवतात आणि ती व्यक्ती ओळखायला सांगतात. वास्तविक आपल्या छोटय़ाशा स्मरणक्षेत्रात असंख्य आवाज साठवलेले असतात. यात माणसांचे, प्राण्या-पक्ष्यांचे, वस्तूंचे, निसर्गाचे किती तरी आवाज असतात. त्यातून बरोबर वाट काढत स्मरणक्षेत्रात साठवलेल्या या प्रसिद्ध व्यक्तीच्या आवाजापर्यंत मेंदूची यंत्रणा पोहचते. नाव आठवतं. जर व्यक्तीचा आवाज आणि नाव स्मरणक्षेत्रात नसेलच तर कसं आठवणार?

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about listen to properly
First published on: 16-01-2019 at 00:25 IST