योग आणि आयुर्वेद यांमध्ये अंत:करण आणि शरीर हे पांच महाभूतांनी आणि त्रिगुणांनी बनलेले असते असे मानले आहे. त्या दृष्टीने त्यांच्यात अद्वैत आहे, स्थूल शरीराचा सर्वात सूक्ष्म भाग म्हणजे अंत:करण होय. त्याचमुळे मनातील विकारांचे, भावनांचे शरीरावर परिणाम होत असतात आणि ते जाणता येतात हे आयुर्वेदात सांगितले आहे.  मल, मूत्र विसर्जन, भूक, तहान यांची जाणीव शरीरात काही संवेदना निर्माण होतात त्यामुळे होते. यांना आयुर्वेदात अधारणीय वेग म्हटले आहे. म्हणजे लघवीला होते आहे याची जाणीव झाली की लगेच मुतारी शोधावी, कंटाळा, टाळाटाळ करू नये. या वेगाचे धारण केले म्हणजे लगेच कृती केली नाही तर आरोग्य बिघडते. कोणत्याही कारणाने लघवी तुंबली असेल तर त्या वेळी रक्तदाब खूप वाढलेला असतो असा अनेक डॉक्टरांचा अनुभव आहे. मल, मूत्र, अपानवायू, शिंका, तहान, भूक, निद्रा, खोकला, श्रमश्वास, जांभई, अश्रू, उलटी आणि शुक्र असे तेरा वेग धारण करू नयेत. मनात राग, भीती, वासना, शोक अशा भावना येतात त्या वेळीही शरीरात बदल होतात. त्यामुळेच यांनाही आयुर्वेदात वेग असे म्हटले आहे. मात्र हे वेग ‘धारणीय’ आहेत. त्यांचे धारण करायचे म्हणजे त्यानुसार लगेच कृती करायची नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भीती वाटते आहे हे लक्षात आले की शरीरावर लक्ष न्यायचे. भीतीच्या परिणामी छातीत धडधड होत असते, श्वासगती वाढलेली असते. शरीरातील हे बदल जाणायचे, त्यांच्यापासून पळून जायचे नाही, जे काही होत आहे त्याला धर्याने सामोरे जायचे. आणि जे काही जाणवते आहे ते वाईट आहे, ते नको अशी प्रतिक्रिया न करता त्याचा स्वीकार करायचा. शरीर आणि मनात जे काही होते आहे ते साक्षीभाव ठेवून जाणायचे, हेच साक्षी ध्यान होय. आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सेत असे ध्यान शिकवले जाते आणि त्याचा एक, दोन मिनिटे अनुभव घेतला तरी भीती, राग, शोक यांची तीव्रता कमी होते. यामुळे ही चिकित्सा चिंतारोग, फोबिया, आघातोत्तर तणाव अशा मानसिक त्रासात तसेच तणावाच्या परिणामी होणाऱ्या मायग्रेन, सोरायसिस, आतडय़ातील जखमा अशा अनेक शारीरिक आजारांतही उपयुक्त ठरू शकते. माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे असेच शरीरमनावर लक्ष नेऊन तेथे जे काही जाणले जात आहे त्याचा साक्षीभावाने स्वीकार. याचा परिणाम मेंदूवर काय होतो, याविषयी सध्या मोठय़ा प्रमाणावर संशोधन होत आहे.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article manovedh akp 94
First published on: 21-01-2020 at 00:01 IST