या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माइंडफुलनेस हा शब्द, पाली भाषेतील सति आणि संस्कृतमधील स्मृति या शब्दासाठी इंग्रजीत वापरला जातो. गौतम बुद्धाने महासतिपट्टणसुत्त सांगितले आहे. विपश्यना शिबिरात गोएंका गुरुजी ते समजून सांगत. असेच विपश्यना सदृश ध्यानाचे शिबीर अमेरिकेत डॉ. जॉन काबात-झिन्न यांनी सत्तरच्या दशकात केले. त्यामुळे त्यांची तणावामुळे असलेली पाठदुखी बरी झाली. त्यानंतर त्यांनी या तंत्राचा लाभ रुग्णांना करून देण्यासाठी त्याला काही योगासनांची जोड देत ‘माइंडफुलनेस  बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’ नावाचा प्रोग्राम बॉस्टनच्या हॉस्पिटलमध्ये सुरू केला. त्यानंतर ‘माइंडफुलनेस’ हा शब्द आणि हे तंत्र लोकप्रिय झाले.

मनातील भावनांचा शरीरातील संवेदनांशी असलेला संबंध गौतम बुद्धांनी स्पष्ट शब्दांत सांगितला आहे. त्यांनी आपल्या ज्ञान प्रक्रियेचे चार टप्पे सांगितले आहेत. कानांना आवाज जाणवतो याला ‘विज्ञान’ असा शब्द आहे. त्या आवाजाचा अर्थ लावला जातो. हा ‘संज्ञा’ नावाचा टप्पा आहे. ही मला दिलेली शिवी आहे हे जाणवले की माझ्या शरीरात एक अप्रिय संवेदना निर्माण होते. याला बुद्धाने ‘वेदना’ हा शब्द वापरला आहे. त्या संवेदनेचा मी द्वेष करतो, ही संवेदना नको अशी प्रतिक्रिया करतो, हा ‘संस्कार’ नावाचा चौथा टप्पा आहे. कानावर पडलेल्या शब्दाचा अर्थ माझी स्तुती असा असेल तर शरीरातील संवेदना सुखद असते. आणि ही संवेदना पुन:पुन्हा हवी असा संस्कार निर्माण होतो. या आसक्ती आणि द्वेषाचे संस्कार भाव निर्माण करतात, त्यामुळे दु:खदायक पुनर्जन्म होत राहतात.

यातून निर्वाण हवे असेल तर संवेदना जाणायच्या, पण त्यांना ही चांगली किंवा ही वाईट अशी प्रतिक्रिया करायची नाही. या आसक्ती किंवा द्वेषाच्या प्रतिक्रियांना बुद्धाने तृष्णा, तनहा हा शब्द वापरला आहे. ही तृष्णा दु:खदायक आहे आणि ती दूर करण्याचा उपाय म्हणजे विपश्यना ध्यान होय. मात्र ते शिकण्याची ठरावीक पद्धती आहे. त्यासाठी दहा दिवसांचे शिबीर करावे लागते.

डॉ. जॉन यांनी शरीरातील संवेदना जाणून त्यांचा स्वीकार करण्याचे तंत्र रुग्णांना दोन तासांच्या सत्रात शिकवायला सुरुवात केली. प्रत्येक आठवडय़ात दोन तास एकत्र यायचे आणि घरी ४० मिनिटे ध्यान करायचे. आठ आठवडय़ाच्या या प्रोग्रामचा फायदा अनेक रोगात दिसू लागला. त्यानंतर त्याचा उपयोग मानसोपचार म्हणूनदेखील केला जाऊ लागला.

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article manovedh akp 9
First published on: 28-01-2020 at 00:03 IST