मुलांच्या मनावरही अनेक ओझी असतात. त्यातही शिक्षणात अशी ओझी असतात. यशपाल समितीने ‘ओझ्याविना अध्ययन’ हा शिक्षणविषयक अहवाल प्रसिद्ध केला, त्यात जड दप्तरांमुळे येणाऱ्या ओझ्याबद्दल लिहिलेलं आहे. पण त्याशिवाय इतर काही ओझ्यांबद्दलही सांगितलं आहे. यातलं एक ओझं म्हणजे- वर्गात बसूनही न कळण्याचं ओझं. आकलन झालं नाही तर तेही एक प्रकारचं ओझंच असतं.
ज्ञानरचनावादानुसार, आकलनासाठी पूर्वज्ञान अवलंबून असतं. एखाद्या विषयातली आधी काय माहिती आहे यावर आज काय समजलं आहे, हे अवलंबून असतं. मुलं स्वत:हून शिकत असतात. त्यांच्यावर सक्ती केली तर शिकण्याची प्रक्रिया थांबते आणि दुसऱ्याचं ऐकून किंवा घोकंपट्टी करून परीक्षा देण्याची पद्धत सुरू होते.
मुलांनी स्वत:हून शिकावं असं वाटत असेल तर त्यांना वर्गात मोकळीक हवी. बोलायची, समजून घ्यायची, समजलेलं सांगायची. पण वर्गात डोकावलं तर असं दिसतं की वर्गातली काही मुलंच बोलत असतात. अनेक मुलांना काही अडचणी असतात. शिकवलेलं सर्व समजलेलं असतंच असं नाही तरीही मुलं विचारत नाहीत. काही ठरावीक मुलं जरूर प्रश्न विचारतात. पण बहुसंख्य मुलं प्रश्न विचारत नाहीत. याची कारणं अनेक आहेत. यापैकी काही कारणं अशी असतात.
काही अडचण असेल, शिकवलेलं समजलं नसेल तर विचारा, असं शिक्षकांनी सांगितलेलं असतं. पण मुलं शिक्षकांना काही विचारायला जात नाहीत. शिक्षक आवडीचे असतील तर मुलं तासाला किंवा नंतर प्रश्न विचारतात. शिक्षक त्याची उत्तरंही देतात. पण काही शिक्षकांना प्रश्न विचारायचं दडपण येतं, त्यामुळे मुलं अभ्यासातल्या अडचणी विचारायला जात नाहीत.
मुलांसमोर खरा प्रश्न मात्र वेगळाच असतो. आपण वर्गात सर्वासमोर प्रश्न विचारला, तर जे काही शिकवलेलं आहे ते आपल्याला कळलेलं नाही, हे सगळ्या वर्गाला कळेल. त्यामुळे मित्र-मैत्रिणी हसतील, चिडवतील या कारणासाठी बहुतेक मुलं वर्गात अडचणी विचारत नाही. मुलांचं वय आणि त्यांच्यासमोरच्या या साध्यासुध्या अडचणी शिक्षकांनी आपणहून लक्षात घेतल्या, मुलांना मोकळीक वाटेल असं वातावरण तयार केलं तर शिक्षणाची ही वाट सहज होईल. सोपी होईल. मुख्य म्हणजे ओझंरहित होईल.
– श्रुती पानसे contact@shrutipanse.com