– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेत सजगता ध्यानाचा मानसोपचार म्हणून उपयोग २००० सालापासून सुरू झाला. २००२ मध्ये डॉ. झिण्डेल सीगल यांनी ‘माइंडफुलनेस-बेस्ड् कॉग्निटिव्ह थेरपी (एमबीसीटी)’ म्हणजे ‘सजगताआधारित मानसोपचार’ असे त्याला नाव दिले. डॉ. सीगल हे कॉग्निटिव्ह थेरपिस्ट म्हणून काम करीत होते. कॉग्निटिव्ह थेरपी डॉ. अ‍ॅरोन बेक यांनी सत्तरच्या दशकात प्रचलित केली. डॉ. बेक यांचा ‘डिप्रेशन’च्या रुग्णांशी संबंध आला. त्यांचे समुपदेशन करीत असताना त्यांना जाणवले की, या रुग्णांच्या मनात आपोआप येणारे विचार ठरावीक पद्धतीचे असतात. अनेक वर्षे असा अभ्यास आणि निरीक्षण करून त्यांनी १९६२ मध्ये ‘कॉग्निटिव्ह थिअरी ऑफ डिप्रेशन’ हा शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यात चिंतनाधारित मानसोपचाराचे मूळ सिद्धांत आहेत. माणसाच्या मनात अनेक विचार येत असतात. ते मुख्यत: स्वत:, अन्य माणसे व भूत/भविष्यकाळ यांविषयी असतात. ‘डिप्रेशन’मध्ये हे विचार ठरावीक पद्धतीचे असतात. मी नालायक आहे, मला कुणाचीही मदत नाही, भविष्य अंधकारमय आहे- असे विचार औदासीन्य निर्माण करतात. ‘वर्थलेस’, ‘हेल्पलेस’ आणि ‘होपलेस’ अशा तीन शब्दांत ‘डिप्रेशन’च्या रुग्णाचे भावविश्व मांडता येते. डॉ. बेक यांनी त्यांच्या समुपदेशनात अशा विचारांना आव्हान देणारे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मनात सतत येणारे हे विचार बदलले तर ‘डिप्रेशन’ कमी होते, हे त्यांनी दाखवून दिले.

डॉ. बेक हा अभ्यास करीत असतानाच विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचे जनक डॉ. अल्बर्ट एलिस यांना भेटले. दोघांनाही- ‘विचार बदलले की वर्तन आणि भावना बदलतात,’ हे मान्य होते. मात्र दोघांच्या समुपदेशन पद्धतींमध्ये काही फरक होते. हे दोन्ही डॉक्टर स्वत:च्या पद्धतीमध्ये संशोधन करीत त्याचे परिणाम जगासमोर मांडत राहिले. त्यामुळे अल्बर्ट एलिस आणि अ‍ॅरोन बेक या दोघांनाही विचारांवर आधारित मानसोपचार पद्धतीचे जनक मानले जाते. त्यांच्या प्रभावामुळे वर्तन चिकित्सेचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. काही काळाने वर्तन चिकित्सेतील काही तंत्रांचा समन्वय या पद्धतींशी केला गेला. त्यातूनच ‘कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी’ आणि ‘रॅशनल ईमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी’ सर्वत्र वापरल्या जाऊ लागल्या. मात्र विचार बदलणे सर्व रुग्णांत शक्य होतेच असे नाही, हे जाणवल्याने २१ व्या शतकात मानसोपचारात ध्यानाचा उपयोग होऊ लागला.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on awareness based psychotherapy abn
First published on: 20-05-2020 at 00:08 IST