डॉ. श्रुती पानसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जरा कुठे नेहमीपेक्षा वेगळा आवाज आला, वेगळी हालचाल जाणवली की आपण कितीही कामात असलो तरी त्या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेतलं जातं. एखादा कीटक जरी आपल्या डावी-उजवीकडून हलक्या पावलांनी चालत गेला तरीसुद्धा डोळ्याचा एक कोपरा आजही ती हालचाल टिपतो, कोणी आपल्या मागून चालत आहे का याचा कानोसा आपण घेतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रियं प्रत्येक क्षणाला काही ना काही माहिती आपल्या मेंदूकडे पाठवत असतात. अत्यंत तत्परतेने ती माहिती मेंदूकडे पाठवली जात असते. योग्य माहिती आपल्या निर्णयकर्त्यां मेंदूकडे पोचते. याचं कारण या ब्रेन स्टेममध्ये आहे.

फार फार वर्षांपूर्वीचं आदिमानवाचं जगणं आठवलं तर हा अवयव किती कामाचा होता हे लक्षात येईल. आपलं अस्तित्व इतर प्राण्यांपासून वाचवण्यासाठी, कुठल्याही दिशेने आणि कितीही अंतरावरून, कोणताही धोका समजावा, यासाठी सर्व बारीकसारीक हालचालींकडे आणि छोटय़ा मोठय़ा आवाजाकडे लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं काम होतं. आणि हे काम तेव्हापासूनच ब्रेन स्टेम या अवयवाकडे होतं.

आपल्या मेंदूतला हा आदिम भाग. आपण माणूस म्हणून जी काही मूलभूत कामं दिवसभरात जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत करत असतो, श्वासोच्छ्वास, दोन्ही पायावर व्यवस्थित तोल साधून उभं राहणं, चालणं, यावेळी ब्रेन स्टेम हा अवयव कार्यरत असतो.  सावधपणा हा या अवयवाच्या रोजच्या कामाचा एक भाग. तसंच, ठराविक काळानंतर ज्ञानेंद्रियांनी टिपलेले काही संदेश थांबवून मेंदूला विश्रांती घेऊ देण्याचं काम हा बजावतो.  त्यालाच आपण झोप असं म्हणतो.

त्यामुळेच एखादी हालचाल जाणवली तर त्या हालचालीला झटपट प्रतिसाद द्यायला हवा हे सांगण्याचं काम याच अवयवाचं. शरीराकडून आलेले संदेश मेंदूकडे पोहचवण्याच्या मधलं नियंत्रकाचं काम ब्रेन स्टेमकडे असतं.  ज्यामुळे त्या माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल, त्या धोक्यांपासून वाचवण्याचं काम या अवयवामार्फत होत असतं. झटपट निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे जीव वाचवला जातो. ब्रेन स्टेमचा  भाग असलेले मेडय़ुला, पॉन्स आणि सेरेबलम हे अवयव एकमेकांच्या मदतीने जीव वाचवत असतात, असं म्हटलं तरी चालेल.

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on danger conscious brain stem abn
First published on: 10-07-2019 at 00:10 IST