– डॉ. यश वेलणकर

कुटुंबाचा व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये मोठा सहभाग असतो. विशेषत: लहान मुलामध्ये चिंता, उदासी अशी लक्षणे दिसत असतील, तर पूर्ण कुटुंबासमवेत समुपदेशन आवश्यक ठरते. मानसोपचारात कुटुंब-उपचार साठच्या दशकात सुरू झाले. त्याची सुरुवात विवाह समुपदेशकांनी केली. वैवाहिक नात्यातील समस्या दूर करण्यासाठी ते पती-पत्नी यांच्याशी एकत्र बोलू लागले. त्याचा परिणाम चांगला होतो हे जाणवल्याने ‘फॅमिली थेरपी’ अशी उपचार पद्धतीच विकसित झाली.

एखाद्या माणसात कोणतीही भावनिक समस्या असेल, तर त्याचे मूळ कुटुंबातील नातेसंबंधात असू शकते. कुटुंबात एखादी व्यक्ती खूप आक्रमक असेल व घरातील इतर व्यक्तींना ती कोणतेही निर्णय घेऊ देत नसेल, तर अन्य व्यक्ती आत्मविश्वास नसलेल्या होऊ शकतात किंवा बंडखोर होऊन कुटुंबाशी फारसे संबंध ठेवू इच्छित नाहीत. या तणावाला योग्य पद्धतीने सामोरे जाणे शक्य झाले नाही, तर चिंता, उदासी, विचारांची गुलामी असे त्रास होऊ लागतात. काही वेळा ‘स्किझोफ्रेनिया’सारख्या आजारात आनुवंशिकता असू शकते. पूर्ण कुटुंबाशी संवाद साधला की, असे काही प्रकट न झालेले पैलू लक्षात येतात.

कोणताही मानसिक विकार असेल, तर त्याचा त्रास कमी होण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यासाठीही संपूर्ण कुटुंबाशी समुपदेशन गरजेचे असते. त्यामध्ये एका घरात राहणाऱ्या सर्व माणसांचे एकमेकांशी असलेल्या नातेसंबंधांतील कंगोरे लक्षात येतात. मानसिक त्रास असलेल्या व्यक्तीशी समुपदेशक ठरावीक काळाने भेटत असतो. अशा वेळी त्या व्यक्तीला रोज आवश्यक असणारा आधार व प्रेरणा कुटुंबातील कोणती व्यक्ती देऊ शकते, याचा अंदाज समुपदेशकाला येतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीला तशी जबाबदारी देता येते. या काळजी घेण्याच्या जबाबदारीचा तणाव येऊ नये यासाठी काय करायचे, याचेही प्रशिक्षण त्या व्यक्तीला देता येते.

ध्यानावर आधारित मानसोपचारात कुटुंबाचा सहभाग खूप मोलाचा असतो. एखाद्या व्यक्तीला कोणताही त्रास असेल, पण त्या व्यक्तीला ते मान्य नसेल तर घरातील सर्व माणसांनी रोज दहा मिनिटे एकत्र बसून ध्यानाचा सराव करायला सुचवता येते. असा सराव करू लागल्याने प्रत्येकालाच सजगता वाढल्याचा अनुभव येतो, मानसिक तणावाचे दुष्परिणाम कमी होत आहेत हे जाणवू लागते.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

yashwel@gmail.com