माणूस देहभान हरपून एखाद्या कृतीमध्ये तन्मय झालेला असतो, त्या वेळी तो काळ त्याच्यासाठी खूप आनंद देणारा असतो. मानसशास्त्रात या स्थितीला ‘फ्लो’ असे   म्हणतात. खेळाडू, गायक, वक्ता याचा अनुभव बऱ्याचदा घेतात. काम करताना काही वेळ अन्य सर्व विचार थांबलेले असतात, त्या कृतीमध्ये पूर्ण एकाग्रता असते, कोणताही तणाव नसतो, अतिशय सहजतेने सर्व कृती घडत असतात, मेंदूतील सर्व ऊर्जा एकाच दिशेने वाहत असते.. त्यामुळेच यास ‘फ्लो’ म्हटले जाते. हे काम अतिशय आनंद देणारे असते. असा आनंद कोणते काम करताना मिळण्याची शक्यता अधिक असते, याचा अभ्यास झाला आहे.

त्या अभ्यासानुसार, कौशल्य आणि आव्हान यांचे योग्य प्रमाण जुळून येते तेव्हा असा तन्मयतेचा, ‘फ्लो’चा आनंद मिळण्याची शक्यता अधिक असते. एखादे काम अगदीच नवीन असते तेव्हा माणूस चुका करीत ते करीत असतो. त्या वेळी दडपणाचा तणाव असल्याने ‘फ्लो’ नसतो. म्हणजेच आव्हान आहे पण कौशल्य नाही, अशा वेळी तन्मयतेचा आनंद मिळत नाही. कौशल्य आहे पण आव्हान नाही, अशा कामातही ‘फ्लो’चा आनंद मिळत नाही. म्हणजेच कामाचा आनंद अनुभवायचा असेल तर त्या कामाचे कौशल्य हवे आणि थोडेसे नावीन्य हवे. एखादे काम रोज करू लागलो की कौशल्य येते, पण आपल्या रोजच्या कामात नावीन्य कसे आणायचे?

येथेच ‘माइंडफुलनेस’चे प्रशिक्षण उपयोगी ठरते. माइंडफुलनेसच्या अभ्यासाने आपण आपले लक्ष- ‘अटेन्शन’ कोठे असावे हे निवडू शकतो. हेच अटेन्शन आपण कामावर, कृतीवर केंद्रित करतो, त्यासाठी त्यामध्ये काही नावीन्य शोधतो. मन वर्तमानात ठेवणे जमू लागले, की ‘फ्लो’चा अनुभव सहजतेने येऊ लागतो. कारण ‘फ्लो’मध्ये लक्ष विचलित करणारे विचार नसतात. एखादे काम माणूस तन्मयतेने करत असतो, त्या वेळी त्याला आनंद मिळतच असतो; पण त्याची कार्यक्षमता पाच पट वाढते. एखादा माणूस केवळ मिळणाऱ्या पैशावर डोळा ठेवून काम करत असतो, तो लवकर थकतो. त्याला कामाचा तणाव अधिक येतो आणि कामात चुकाही अधिक होतात. हे टाळण्यासाठी माइंडफुलनेसचा सराव करून ‘फ्लो’ अनुभवावा. सध्या घरातच गायन, वादन आदींमध्ये असा ‘फ्लो’चा अनुभव घेणे शक्य आहे. त्यासाठी प्रेक्षक या भूमिकेतून बाहेर पडून काही कृती करायला हवी.

डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com