सुनीत पोतनीस

२२ सप्टेंबर १९६० रोजी प्रजासत्ताक माली हा सार्वभौम देश अस्तित्वात आला. परंतु पुढचा साधारणत: तीस वर्षांचा काळ हा मालीमध्ये अत्यंत अनागोंदी व गोंधळाचा गेला. या काळात या प्रदेशात अनेकदा पडलेला दुष्काळ आणि त्यामुळे झालेले दुर्भिक्ष, लष्करी दडपशाही, सरकार आणि लष्कराविरोधात सतत होणारे उठाव, संप, गनिमी हल्ले यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली.

१९६० मध्ये मालीच्या अध्यक्षपदी असलेल्या मोडिबो केटा यांनी एकपक्षीय विधिमंडळ स्थापून समाजवादी सरकार सत्तेवर आणले. पुढे १९९१ साली विरोधकांचा उठाव होऊन नवीन राज्यघटना लिहिली गेली. या राज्यघटनेप्रमाणे मालीमध्ये बहुपक्षीय लोकशाहीवादी निर्वाचित सरकार सत्तेवर आले. लोकशाहीवादी सरकार येऊनही मालीत चाललेल्या अंतर्गत संघर्षांमुळे राजकीय आणि सामाजिक स्थैर्य नव्हते. २०१२ साली इस्लामिक संघटनेने उत्तर मालीतल्या अनेक गावांवर हल्ले करून ताबा मिळवला. मात्र तिथे लष्कराने हस्तक्षेप करून ती गावे परत मिळवली.

पुढे १८ ऑगस्ट २०२० रोजी मालीच्या लष्कराने कारवाई करून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इब्राहीम केटा आणि पंतप्रधान यांना पदच्युत करून अटक केली आणि बा एनडा यांना हंगामी राष्ट्राध्यक्ष नियुक्त केले. सध्या मालीमध्ये हे हंगामी सरकार कार्यरत आहे.

मालीमध्ये अकराव्या शतकात इस्लामचा शिरकाव झाला आणि सध्या त्या देशाच्या दीड कोटी लोकसंख्येपैकी नव्वद टक्के लोक इस्लामधर्मीय आहेत. माली हे आफ्रिकेतले एकेकाळचे विद्वत्तेचे माहेरघर. मालीच्या उत्तरेतले टिंबक्टू हे नगर पंधराव्या व सोळाव्या शतकात तिथल्या इस्लामिक सांकोर या विद्यापीठामुळे प्रसिद्ध होते, तसेच सांस्कृतिक व व्यापारी केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते. सध्या दुरवस्था असलेल्या टिंबक्टूमध्ये त्याकाळी जगभरातल्या विद्वानांचा राबता होता. मध्ययुगीन काळातले अनेक मौल्यवान ग्रंथ इथे सापडले आहेत. सहारा प्रदेशातील जुन्या व्यापारी मार्गावर टिंबक्टू असल्यामुळे येथून युरोप आणि मध्यपूर्वेत सोने व कापसाचा व्यापार चालत असे. युरोपातून इथे मीठ आयात केले जाई. एकेकाळी मालीमध्ये सोने आणि मिठाचा एकच भाव होता असे म्हटले जाते. सध्या मालीची अर्थव्यवस्था कापूस, तांदूळ व काही प्रमाणात सोने यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com