या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रगत, प्रगतिशील आणि अप्रगत देश मिळून वापरत असलेल्या खनिज इंधनांच्या अतिरेकी वापरामुळे वातावरणात हरितगृह वायूंची- विशेषत: कार्बन डायऑक्साइडची सातत्याने वाढत असलेली पातळी आणि यामुळे होत असलेली जागतिक तापमानवाढ व हवामान बदल यांसारख्या समस्या नजीकच्या भविष्यात मानव व इतर सजीवांसाठी संहारक ठरू शकतात. यामुळे या बदलांना थोपवण्यासाठी खनिज इंधनांना पर्याय म्हणून पुनर्नवीकरण शक्य असणाऱ्या नैसर्गिक ऊर्जास्रोतांवर जगभर संशोधन सुरू आहे. या स्रोतांमध्ये सौरऊर्जा हा सर्वात आश्वासक, स्वस्त, स्वच्छ व चिरंतन पर्याय आहे.

या पार्श्वभूमीवर, ३० नोव्हेंबर २०१५ रोजी पॅरिस येथील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक रचनात्मक अधिवेशनात (यूएन-एफसीसीसी) सदस्य पक्षांच्या २१ व्या वार्षिक परिषदेत भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या वेळचे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा होलांद यांच्यासह ‘आंतरराष्ट्रीय सौर युती’च्या स्थापनेची घोषणा केली. ही युती आंतरशासकीय (इंटर-गव्‍‌र्हन्मेंटल) स्वरूपाची असून, ती उष्ण कटिबंधातील देशांसह इतर देसांसाठीही खुली ठेवली गेली.

आज आंतरराष्ट्रीय सौर युती १२१ सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रांखालोखाल सदस्यसंख्या असलेली दुसऱ्या क्रमांकाची संस्था बनली आहे. या युतीचे मुख्यालय भारतात (गुरुग्राम, दिल्ली) आहे. या युतीची प्रमुख उद्दिष्टे अशी : (१) सदस्य देशांच्या ऊर्जागरजेनुसार सौरऊर्जा प्रकल्पांसाठी एकत्रित रीतीने प्रयत्न, (२) खासगी व सामुदायिक गुंतवणूकदारांकडून निधी (१०० कोटी डॉलर्सपर्यंत) उभारून १ ते १०० टेरावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, (३) भारत २०२२ पर्यंत १०० गीगावॅट सौर व एकूण १७५ गीगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारेल, (४) युतीतील देशांच्या प्रशिक्षणासाठी भारत ५०० सत्रे उपलब्ध करेल, संशोधन-विकासाचे उद्दिष्ट असलेली सौर-तंत्रमोहीम सुरू करेल, (५) युतीतील १२१ देशांपैकी ५६ देशांनी करार केले आहेत; उर्वरित देशांशी करार करणे व अधिक सदस्य जोडून घेणे.

याशिवाय युतीची आपत्कालीन प्राथमिकता असणाऱ्या गोष्टी पुढीलप्रमाणे : सदस्य देशांना सौर धोरण आखण्यास मदत करणे; सौरऊर्जा प्रणालींचा विकास-दर्जा, निर्देश (स्पेसिफिकेशन्स) व परीक्षण टिपण (टेस्ट प्रोटोकॉल) निश्चित करणे; सदस्य देशांतील सौर संसाधन प्रतिरेखन (सोलर रिसोर्स मॅपिंग) व सुयोग्य तंत्रज्ञान वापर यासाठी प्रोत्साहन देणे; धोरणकर्ते, अभियंते, विद्यार्थी यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यशाळा, परिषदा, बैठका आयोजित करणे; सदस्य देशांसह सौर रोषणाईच्या वैश्विक उपलब्धतेसाठी प्रयत्न करणे.

– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on international solar alliance abn
First published on: 07-08-2020 at 00:06 IST