चुंबकाकडे आकर्षलिा जाणारा धातू ही लोहाची (लोखंडाची) पहिली ओळख. आवर्त सारणीतील चौथ्या आवर्तनातील आठव्या श्रेणीतील अणू क्रमांक २६ असलेले हे मूलद्रव्य! लोह हे विश्वातील प्रथम दहा रासायनिक घटकांतील एक समजले जाते. लॅटिन फेरम (Ferrum) या शब्दापासून ोी या संज्ञेने लोह ओळखले जाते. पृथ्वीचा गाभा तसेच पृष्ठभाग हा मोठय़ा प्रमाणात लोहाचा बनलेला आहे. सामान्यपणे मातीमध्ये तसेच मँग्नेटाइट आणि टॅकोनाईट यांसारख्या इतर खनिजांतही लोह आढळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यापारी-दृष्टय़ा लोह हे कार्बन, चुना, हेमेटाइट (खनिज) किंवा मॅग्नेटाईट आणि चुनखडी यांचे मिश्रण भट्टीत गरम करून तयार करता येते. जगभरात दरवर्षी १.३ अब्ज टन कच्चे पोलादाची निर्मिती होते. ओलसर हवेत लोखंड लगेच गंजते. रासायनिकदृष्टय़ा सक्रिय असल्यामुळे ते सौम्य आम्लामध्ये देखील सहज विरघळते. (लोखंडापासून दुहेरी किंवा तिहेरी शृंखला असलेली रासायनिक संयुगे तयार करता येतात. पोलाद हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.)

इ.स.पूर्व ३५००च्या सुमारास इजिप्तमध्ये प्रथम लोखंडी वस्तू सापडल्याची नोंद आढळते. यावरून लोखंडाचे मानवाच्या आयुष्यातील स्थान लक्षात येते. लोखंडातील कार्बनच्या प्रमाणानुसार, त्याचे कच्चे  लोखंड, ओतीव लोखंड आणि पोलाद असे तीन प्रकार

तयार होतात. लोखंडापासून पोलाद निर्मिती अठराव्या शतकात सुरू झाली आणि औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पोलादाचा उपयोग सुईपासून जहाजापर्यंत तर रोजच्या वापरातील भांडय़ापासून विमानापर्यंत केला जातो. पोलाद (स्टील) हा चांदीसारखा चमकदार आणि लवचिक धातू आहे. पोलादामध्ये क्रोमिअम (१०.५ %) मिसळले असता स्टेनलेस स्टील तयार होते. स्टेनलेस स्टील गंजत नसल्याने याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. लोखंडाची मजबुती वाढविण्यासाठी त्यात निकेल, मॉलिब्डेनम, टिटॅनिअम आणि तांबे मिसळले जाते. वैद्यकीय उपकरणे, स्थापत्य अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रात पोलादाचा वापर केला जातो.

लोह हा आपल्या शरीरातीलसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवी शरीराला दररोज सरासरी १० ते १८ मिलीग्रॅम लोहाची गरज भासते. रक्ताला लाल रंग देखील लोहामुळेच प्राप्त झाला आहे. मांस, हिरव्या पालेभाज्या, सफरचंदासारखी फळे हा अन्नातील लोहाचा प्रमुख स्रोत आहे. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, कमी रक्तदाब यांसारखे आजार होऊ शकतात.

ललित जगन्नाथ गायकवाड

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on iron
First published on: 04-05-2018 at 01:40 IST