पर्यावरण रक्षण म्हणजे नेमके काय असे विचारले तर ‘सात आंधळे आणि एक हत्ती’ या गोष्टीची सुधारित आवृत्ती होईल अशी अनेक उत्तरे मिळतील. पण साधे सरळ उत्तर हे की या पृथ्वितलावर स्वच्छ हवा, स्वच्छ निर्मळ पाणी असावे; जगभर सर्वाना ते पुरेसे असावे आणि त्यासाठी आपण जागरूक असावे. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पर्यावरण शाळेसारखे उपक्रम आवश्यक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही पर्यावरण शाळा शालेय विद्यार्थ्यांसाठीच असावी; परंतु  नेहमीच्या शाळेसारखी नसावी. शहरांमधल्या मुलांची निसर्गाशी तशी जवळीक नसते. त्यांना वेगळ्या पद्धतीने निसर्गाची ओळख करून द्यावी लागते. ग्रामीण भागातील मुले निसर्गाच्या जवळ आहेत; पण म्हणून त्यांची निसर्गाशी जवळीक असेलच असे नाही. आपल्याकडे आहे ते किती मूल्यवान आहे, त्याचे जतन करायला हवे असा विचार करण्याची नैसर्गिक सवय त्यांना लागेल असे कार्यक्रम तिथे घडवून आणायला हवेत.

‘निसर्ग देतो म्हणून ओरबाडू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, निसर्ग अनेक वेळा काही सांगतो त्याच्याकडे डोळेझाक करू नका’ अशा मूलभूत विचारांवर आधारलेली ही पर्यावरण शाळा त्यांना निसर्गाकडे बघण्याचा तिसरा डोळा देईल. प्रत्यक्ष कृतींतून घेतलेले निसर्गाचे, निसर्ग रक्षणाचे शिक्षण मुलांच्या कायम लक्षात राहते. उदाहरणार्थ, ‘प्लास्टिकचा कचरा करू नका, ते पर्यावरणाला अतिशय घातक आहे’ असे सांगण्यापेक्षा ‘घरातला प्लास्टिकचा कचरा घेऊन या, आपण त्यापासून छान छान वस्तू बनवू, त्याचं जतन करू’ असे सांगून त्यांच्याकडून ते करवून घेणे अधिक योग्य नाही का? अशा विविध कृतींतून मुलांची निसर्गाशी मैत्री होऊ शकते.

सतत शिकवणी, खूप क्लिष्ट अभ्यासक्रम, लांबलचक व्याख्याने देऊन त्यांच्यावर सतत माहितीचा मारा करणे असे या ‘पर्यावरण शाळे’चे स्वरूप नसावे. जसे माणसापेक्षा झाडे पटकन वाढतात, सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागते पण एकदा मुळे धरली की मुळेच पाणी शोधतात आणि वेगाने वाढतात; तशीच या शाळेतील शिक्षणाची प्रक्रिया असावी. मुलांची मने पर्यावरण ज्ञानाच्या शाश्वत निर्झराशी एकदा जोडून दिली की ते स्वावलंबी होऊन अधिक प्रगल्भ विचार करू शकतील आणि शाश्वत ज्ञानाचे विचारकेंद्र बनतील.

– नेहा घागरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on rural environment school abn
First published on: 19-06-2020 at 00:06 IST