– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहितीवर प्रक्रिया करून विचार निर्माण करणे हे मेंदूचे काम आहे. ‘या क्षणी मी निवांत आहे/ कंटाळा आला आहे’ हाही एक विचारच आहे. निसर्गत: निवांतपण, उत्साह, कंटाळा आणि काळजी असे किमान चार प्रकारचे विचार निर्माण व्हायला हवेत. मात्र मेंदू काही वेळा सवयीने चाकोरीबद्ध विचार करू लागतो. चिंतन चिकित्सेमध्ये (कॉग्निटिव्ह थेरपी) अशा विचारांच्या चाकोरी शोधून त्या बदलण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही प्रसंगात १०० टक्के आपल्या मनासारखे घडत नाही. एखाद्या कार्यक्रमाला ५० माणसांना बोलावले असेल, तर त्यातील ४० आली तरी ते यश म्हणता येते. मात्र उदासीनतेकडे झुकणाऱ्या व्यक्तीला न आलेली दहा माणसेच आठवत राहतात. आयुष्यात मिळवण्यासारख्या दहा गोष्टी असतील, तर त्यातील चार-पाच मिळतात. पण ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्यांचेच विचार मनात येत राहतात. ‘काय आहे’ यापेक्षा ‘काय नाही’ तेच आठवत राहते.

सारे काही छान आणि घाण अशा दोन प्रकारांत विभागणे ही विचारांची दुसरी चौकट असते. जग काळ्या आणि पांढऱ्या अशा दोनच रंगांत पाहिले जाते. त्यामधील करडय़ा छटा लक्षातच घेतल्या जात नाहीत. प्रत्येक माणसात काही गुण, काही दोष असतात. पण त्यांचे भान राहत नाही, त्यामुळे स्वत:ला किंवा इतरांना पूर्णत: नालायक ठरवले जाते. हीच चाकोरी अधिक खोल गेली, की सार्वत्रिकीकरण होऊ लागते. म्हणजे एका परीक्षेत यश मिळाले नाही किंवा एका प्रियकराने फसवले याचा अर्थ- ‘माझे पूर्ण आयुष्य वाया गेले, आता जगण्यासारखे काहीच नाही; मी पूर्णत: अपयशी आहे; माझ्यावर कुणीच प्रेम करीत नाही,’ अशा विचारांचा प्रवाह मनाचा ताबा घेतो.

प्रत्येक व्यक्तीसाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ती स्वत: असते. पण असेच महत्त्व इतरांनीही द्यावे असे वाटते. ते मिळाले नाही, ‘फेसबुक’वरील नोंदीला अपेक्षित अंगठे मिळाले नाहीत, की ‘मला कुणीच महत्त्व देत नाही’ अशा विचारांनी उदासी येते. कॉग्निटिव्ह थेरपीमध्ये समुपदेशक मनातील अशा वैचारिक चौकटी शोधतात आणि त्या कशा बदलायच्या याचे प्रशिक्षण देतात. मनात येणारे विचार अशा चौकटीतील आहेत हे लक्षात येऊ लागले, की व्यक्ती त्यामधून बाहेर पडून विवेकी विचार करू लागते. विचार बदलले की भावना बदलतात आणि औदासीन्यावर मात करता येते.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on rut of thought abn
First published on: 06-07-2020 at 00:07 IST