डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाणीवपूर्वक विचार करणे हे कौशल्य आहे. एडवर्ड डी बोनो यांचे यावरील ‘सिक्स थिंकिंग हॅट्स’ हे लोकप्रिय पुस्तक आहे. कोणताही निर्णय घेताना माणूस सहा प्रकारे विचार करू शकतो. या सहा प्रकारांना सहा रंग दिले आहेत. त्या रंगाची हॅट डोक्यात आहे अशी कल्पना करून त्या वेळी त्याच प्रकारे विचार करायचा. बऱ्याच जणांना एकाच प्रकारे विचार करण्याची सवय असते, ती बदलायची. सर्वात प्रथम पांढरा रंग; आपल्याला काय साधायचे आहे हे नक्की करून त्यासाठी कोण कोणते पर्याय आहेत, याची माहिती घेणे या प्रकारात येते. आता एकेक पर्याय घ्यायचा आणि त्याचे कोण कोणते फायदे आहेत याचा विचार करायचा, ही झाली पिवळी हॅट. या वेळी तोटय़ांचा, धोक्यांचा विचार करायचा नाही. असा विचार म्हणजे काळी हॅट. तीदेखील आवश्यक असते. केवळ ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’ चुकीचे आहे. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. प्रत्येक पर्यायाची काही ना काही किंमत मोजावी लागते. ती काय असू शकते, याचा विचार करायचा. लाल रंग भावनांचा; या पर्यायांपैकी काय निवडावे असे मन सांगते आहे, तेही विचारात घ्यायचे.  मात्र पूर्णत: त्यावर अवलंबून राहायचे नाही, त्याला निर्णय प्रक्रियेत फक्त वीस टक्के महत्त्व द्यायचे. त्याला समजून घ्यायचे; पण निर्णय बुद्धीनेच घ्यायचा. हिरवा रंग नवीन कल्पनांचा,  सर्जनशीलतेचा! आपल्याला जे काही साध्य करायचे आहे त्याचे काही नवीन मार्ग आहेत का, वेगळीच ‘आयडिया’ सुचते आहे का, असा विचार करायचा- म्हणजे हिरवी हॅट घालायची. निळा रंग आकाशाचा; या पाचही रंगांच्या विचारांकडे तटस्थपणे पाहून त्यातील एक पर्याय निवडायचा- म्हणजे निर्णय घ्यायचा. निर्णय घेताना गोंधळ उडण्याचे कारण परस्परविरोधी विचार एकाच वेळी येत असतात. पाण्यात परस्परविरोधी प्रवाह एकत्र आले की भोवरा तयार होतो. असाच भोवरा मनात होतो आणि त्यामध्ये आपण गटांगळ्या खाऊ लागतो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी प्रवाह वेगवेगळे करायचे. विचारांचा गुंता सोडवण्याचे कौशल्य सरावाने विकसित करता येते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. साक्षीभाव विकसित करायचा म्हणजे भविष्याचा विचार करायचाच नाही असे नाही. काही वेळ कर्ता भाव स्वीकारून असा विचार करायला हवा. मात्र विचार करून निर्णय घेतला, की पुन:पुन्हा तेच ते विचार येत राहतात. त्यांना महत्त्व न देता ते साक्षीभावाने पाहायला हवे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on thoughtfulness abn
First published on: 15-04-2020 at 00:05 IST