डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राग हे नाराजी व्यक्त करण्याचे साधन आहे, हा सिद्धांत मानसशास्त्रात ‘फ्रस्ट्रेशन-अ‍ॅग्रेशन हायपोथेसिस’ या नावाने ओळखला जातो. जॉन डोलार्ड यांनी १९४० मध्ये तो प्रथम मांडला. त्यानंतर त्यावर बरेच संशोधन, त्याअंतर्गत प्राण्यांवर प्रयोग केले गेले. त्यातून या सिद्धांताला बळकटी मिळत गेली. आपल्याला जे हवे आहे ते मिळाले नाही की आलेली नाराजी रागाच्या रूपात व्यक्त होते. प्राण्यांवरील प्रयोगांत असे लक्षात आले की, जीवावर आलेल्या संकटापासून पळून जाऊन बचाव करण्याची संधी असेल तर प्राणी तो पर्याय प्रथम निवडतात; पण संकट खूपच जवळ असेल आणि पळून जाण्याची संधी नाही असे त्यांच्या मेंदूला वाटले तर प्राणी आक्रमक होतो. उदा. मांजरीचे फिस्कारणे. असे केल्याने शत्रू गांगरतो आणि पळून जाण्याची संधी मिळते.

जीवावरील संकटाच्या वेळी हे होते, तसेच वंशसातत्य या ध्येयाच्या आड दुसरे स्पर्धक आले तरी बैल, कुत्रे त्वेषाने एकमेकांशी झुंजतात. त्यातील एक नर इतरांना पळवून लावतो. पळून गेलेले नर दुसऱ्या त्यांच्यापेक्षा दुबळ्या प्राण्यावर निराशेतून आलेला राग व्यक्त करतात. प्राण्यांमधील मादी तिच्या पिल्लांवर संकट आले की आक्रमक होते. अन्य प्राण्यांचा स्व त्यांचा देह आणि त्यांची पिल्ले एवढाच असतो.

माणसाचा स्व मात्र परिवार, जात, धर्म, भाषा, देश, तत्त्वज्ञान अशा अनेक गोष्टींशी जोडलेला असतो. त्याला धोका आहे असे वाटले की तो रागावतो. झुंडीत असेल तर हा राग बेभानपणे व्यक्त होतो. बरीच माणसे स्वत:च्या परिस्थितीवर नाराज असतात, ती नाराजी कुणाला तरी मारून, तुडवून व्यक्त करावी असे त्यांच्या सुप्त मनात असते. तशी संधी मिळाली की ‘हात साफ करून घेतला’ असे म्हणून ती स्वत:चा आनंद व्यक्त करतात.

हिंसा हा माणसाच्या सुप्त मनातील भाव आहे. तो व्यक्त करायची संधी योग्य प्रकारे मिळावी म्हणूनच बरेचसे खेळ शोधले गेले. मात्र सध्या सामान्य माणसे असे खेळ प्रत्यक्षात कमी खेळतात. स्क्रीनवर खेळ पाहून शरीरातील या ऊर्मीला व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष शारीरिक व्यायाम करायला हवा. नैराश्याने राग आला असेल तर दहा उडय़ा मारायच्या, नाचायचे, जोरबैठका काढायच्या. असे व्यायाम केले तर चुकीच्या ठिकाणी व्यक्त होणारी नाराजी आणि तिचा शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on violence in the mind abn
First published on: 28-04-2020 at 00:04 IST