डॉ. सुनंदा ज. करंदीकर
बोस्टन डायनॅमिक्स ही यंत्रमानव आरेखन व निर्मिती करणारी एक अमेरिकी अभियांत्रिकी कंपनी असून तिची स्थापना १९९२ मध्ये मार्क रायबर्ट यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून केली. सहसंस्थापक असलेल्या नॅन्सी कॉर्नेलियस यांनी प्रथम कर्मचारी म्हणून सामील होऊन अधिकारीपदही सांभाळले. त्या निवृत्त झाल्यावर गूगलने कंपनी विकत घेतली. यानंतर ती सॉफ्टबँक समूहाकडे गेली. सध्या ती ह्युंदाई मोटर ग्रुपच्या मालकीची आहे. सहसंस्थापक रॉबर्ट बोस्टन डायनॅमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

बोस्टन डायनॅमिक्स या कंपनीने सुरुवातीला अमेरिकन सैन्यासाठी डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्सच्या निधीतून चतुष्पाद बिगडॉग यंत्रमानव विकसित केला. यात हालचालीसाठी चार चाकांचा वापर केला होता ज्यामुळे तो खडबडीत पृष्ठभागावर जाऊ शकतो. बिगडॉगची लष्करी आवृत्ती असलेला अल्फाडॉग गरम, थंड, ओले, गलिच्छ अशा कोणत्याही वातावरणात कार्यक्षम आहे. खडबडीत भूप्रदेशातून जाताना मार्गदर्शनासाठी यात संगणक दृष्टी आणि वैश्विक स्थान प्रणालीचा (जीपीएस) वापर केला आहे.

हेही वाचा : कुतूहल: स्मार्ट वाहनांसाठी स्मार्ट गुणवत्ता नियंत्रण प्रणाली

बोस्टन डायनॅमिक्स आपल्या यंत्रमानवांना अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यांच्यात चपळ, स्वायत्त कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्वयंशिक्षण समाविष्ट करते. त्यांच्या नवीन अॅटलस या बुद्धिमान यंत्रमानवात डोळे नसून त्याऐवजी, त्याचे काम करणारे एक वर्तुळ आहे.

फ्लोरिडामध्ये अपहरण झालेल्या मुलांच्या सुटकेसाठी बोस्टन डायनॅमिक्सच्या यंत्रमानवाचा वापर करण्यात आला. त्यांच्या काही यंत्रमानवांचा उपयोग बॉम्ब निकामी करण्यासाठी केला जातो. हे यंत्रमानव फक्त सार्वजनिक सुरक्षेसाठी वापरले जात नाहीत तर ते औद्याोगिक क्षेत्रातही वापरले जातात. शीतपेय उत्पादन व्यवसायाची तपासणी करणारा यंत्रमानव ओल्या जमिनीवर सहज सरकू शकतो. बोस्टन डायनॅमिक्सचे सर्वांत अलीकडील परंतु कमी ज्ञात उत्पादन हे स्ट्रेच नावाचा यंत्रमानव आहे. त्याच्या मदतीने गोदामातील कामे सहज स्वयंचलित करता येतात. स्ट्रेच यंत्रमानव गोदामात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने हस्तकौशल्य वापरून विविध प्रकारे हातांनी विविध आकारांच्या पेट्या (बॉक्स) उचलू शकतो.

हेही वाचा : कुतूहल: स्वयंचलित वाहने आणि भारत

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवाचे जीवन समृद्ध करणाऱ्या यंत्रमानवांची निर्मिती करणे, हे बोस्टन डायनॅमिक्स कंपनीचे ध्येय आहे. ज्यामुळे कामाचा धोका कमी होईल. बोस्टन डायनॅमिक्सने निर्माण केलेल्या कोणत्याही यंत्रमानवाचा शस्त्र म्हणून वापर करण्यास कंपनी समर्थन देणार नाही, असा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. यापुढे निर्माण करण्यात येणाऱ्या यंत्रमानवांसाठी प्रगत नियंत्रण प्रणाली आणि अत्याधुनिक हार्डवेअरचा वापर केला जाईल. ते अधिक सक्षम, उपयुक्त, कुशल आणि चपळ असतील.

डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org