या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘चल की पक्या, खेळायला,’’ असे मित्रांनी म्हटल्यावर ‘‘नको रं ‘मम्मी’ माका वरडल,’’ असं गावातल्या पोराचं उत्तर कानावर पडलं! तेव्हा असं वाटलं की, का बरं हा पोरगा ‘मम्मी’ म्हणतो आहे? अर्थातच त्याच्या लहानपणी त्याच्या पालकांनी त्याला तसं म्हणण्याची सवय लावली असणार. मध्यम वर्गात मम्मी, पप्पा, उच्च मध्यम वर्गात ममा, पपा, मॉम, डॅडी असं म्हटल्याने आपण आधुनिक होतो का? आपल्या मुलाने आपल्याला मम्मी म्हणावं असं वाटणंच मुळी गुलामीचं लक्षण नव्हे का? परंतु पालक मुलांना ते मिरवायला लावतात, हे दुर्दैव आहे.

   अशा बाह्य अनुकरणाने आपण नेमकं काय साधणार आहोत? एतद्देशीयांपेक्षा निराळय़ा, खास त्यांच्याच संस्कृतीत आहेत अशा संकल्पनांसाठी आवश्यक आणि अपरिहार्य तिथे इंग्रजी जरूर वापरावी, त्याला ना नाही. किंबहुना मराठी इंग्रजीसह सोबत घेऊन जावी लागणार आहे हे ढळढळीत दिसतं आहे पण लग्नाच्या निमंत्रण पत्रिका, मंदिरांचे जीर्णोद्धार, बारशाच्या पत्रिका कशासाठी रोमन लिपीत छापायच्या?

   ‘माझी भाषा तितकीशी सक्षम नाही, ती जगाच्या बाजारपेठेत माझ्या मुलाला नोकरी मिळवून देणार नाही’ अशा अवाजवी भीतीमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आधार घेतला जातो. महाविद्यालयांच्या भाषा विभागांनाही त्यांचे अहवाल नॅकसाठी इंग्रजीतून देण्याची सक्ती आहे. राष्ट्रीय परिषदेचे बीजभाषण इंग्रजीत केले नाही तर जणू काही आपण सुशिक्षित ठरणार नाही असे वक्त्यास वाटते की काय नकळे.

    स्वातंत्र्यापूर्वी भाषेचा जो स्वाभिमान आमच्यात होता तो आता बहुतेक उरलेलाच नाही. आपण मनाने दास झालेलो आहोत हे कबूल केले पाहिजे. इंग्रजी आता भारतीय भाषा झालेली आहे, तिला परकीय म्हणू नका, असेही काहींचे मत आहे. ती आता भारतीय भाषा झालीच आहे तर, हळूहळू ती पुढच्या पिढय़ा-पिढय़ांची निजभाषाही बनेल अशी स्थिती आहे. आज मराठी भाषेला अभिजात म्हणून दर्जा मिळावा यासाठी महाविद्यालयांमध्ये छोटे छोटे मंडप घालून विद्यार्थ्यांकडून पोस्ट-कार्डावरती फक्त सह्या घेतल्या जात आहेत. अरे, निदान एक पत्र तरी त्यांना स्वत:ला लिहू द्या. तेही छापून आणलेले आहे आणि त्या पत्रावर स्वाक्षऱ्या मुलं रोमन लिपीतून करत आहेत यासारखे दुर्दैव ते काय?

– डॉ. निधी पटवर्धन

nidheepatwardhan@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra elite marathi childhood parents language culture ysh
First published on: 07-04-2022 at 00:02 IST