scorecardresearch

भाषासूत्र : वाक्प्रचारांवर खेळांच्या भाषेचा पगडा

वाक्प्रचारांवर खेळांच्या भाषेचा पगडा कसा आहे, वाक्प्रचारांची मुळे कशी खोलवर पोहोचलेली आहेत; या संदर्भातील ही काही उदाहरणे नक्कीच मनोरंजक ठरतील!

वाक्प्रचारांवर खेळांच्या भाषेचा पगडा कसा आहे, वाक्प्रचारांची मुळे कशी खोलवर पोहोचलेली आहेत; या संदर्भातील ही काही उदाहरणे नक्कीच मनोरंजक ठरतील! ‘पगडा बसणे’ हाच वाक्प्रचार पाहा. यातील ‘पगडा’ हा शब्द पगडडाव या सोंगटय़ांच्या खेळाशी जोडलेला आहे. हा खेळ खेळताना फासे वापरले जात. पगडा म्हणजे फाशावरची एक संख्या. या खेळात विवक्षित दान पडले की मेलेली नरद पुन्हा बसवता येत असे. (नरद – फारसी नर्द – म्हणजे खेळातील एक सोंगटी ) त्यामुळे  डावावर जोर येत असे. पगडा बसणे म्हणजे प्रभाव पडणे असा वाक्प्रचार त्यातून रूढ झाला.

‘गुलदस्त्यात ठेवणे’ या वाक्प्रचारातील ‘गुलदस्त’ हा शब्द गंजिफाच्या खेळाशी निगडित आहे. हा खेळ महाराष्ट्रात ‘दशावतारी’ या नावाने ओळखला जातो. त्यात वाटोळय़ा १२० पत्त्यांचा जोड असतो. या खेळात पाने वाटताना चार चार पाने न पाहता बाजूस ठेवतात आणि शेवटी लावतात. त्यांना गुलदस्त म्हणतात. त्यामुळे  ‘गुलदस्त्यात ठेवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गुप्त ठेवणे.

‘शह देणे’ हा वाक्प्रचार बुद्धिबळाच्या खेळातील एका डावपेचाशी संबंधित आहे. फारसी ‘शाह’ शब्दाचा अर्थ राजा. बुद्धिबळ खेळताना प्रतिपक्षाच्या राजावर जेव्हा हल्ला होण्याची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा राजाला हलवणे भाग पडते. त्यामुळे शह देणे या वाक्प्रचाराचा अर्थ  भीती दाखवणे, इशारा देणे असा होतो. याला जोडूनच दुसरा डावपेच येतो, तो म्हणजे ‘काटशह देणे’. आपल्या राजावर दबाव आला की प्रतिपक्षाच्या राजाला जरबेत ठेवण्यासाठी पाऊल उचलावे लागते. राजकारणात शह देणे आणि काटशह देणे, हे तंत्र नेहमी वापरतात.

 ‘छक्केपंजे  ओळखणे’ हा वाक्प्रचार पत्ते खेळण्याशी निगडित आहे. छक्केपंजे म्हणजे पंजा (पाच) च्या ठिकाणी छक्का (सहा) किंवा छक्क्याच्या ठिकाणी पंजा हातचलाखीने लावणे. त्यामुळे छक्केपंजे ओळखणे या वाक्प्रचाराचा अर्थ लबाडी ओळखणे असा होतो. अशा वाक्प्रचारांचा  मार्मिक वापर म्हणजे  जणू भाषेच्या सुप्त सामर्थ्यांचे दर्शन घडवणारा खेळच वाटू लागतो!

–  डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhashasutra language of games phrase of language phrases interesting ysh

ताज्या बातम्या