‘‘मॅडम, मराठी सब्जेक्ट चेंज करायचा आहे. काय प्रोसीजर आहे?’’ खरं सांगायचं तर अशी वाक्यं महाविद्यालयात किंवा कुठेही कानावर पडणं यात आज मोठं आश्चर्य वाटत नाही.
मराठी वाक्यात आलेल्या इंग्रजी शब्दांकडे लक्ष द्यावं की इंग्रजीमिश्रित का होईना काही मराठी शब्द वापरून तरी बोललं आहे, यात समाधान मानावं असा प्रश्न पडतो. शाळा, महाविद्यालय अशा ठिकाणी आज ‘बाई’ आणि ‘गुरुजी’ या शब्दांची जागा ‘मॅडम’ किंवा ‘मॅम’ आणि ‘सर’ या शब्दांनी घेतली आहे. फक्त शिक्षक किंवा प्राध्यापकच नव्हे तर इतरत्रही आदरार्थी उल्लेख करण्यासाठी हे शब्द वापरले जातात. ज्या परभाषीय शब्दाचं मराठीत सामान्यरूप होऊन तो मोठय़ा प्रमाणावर वापरला जातो, तो शब्द मराठी झाला असं मानलं जातं. यानुसार मॅडमना, सरांना असा उल्लेख होत असल्याने हे शब्द आता मराठीच झाले असं म्हणावं का? या शब्दांना अजून काही पर्यायी शब्द पुढे आणता येतील का?
‘बाई’ आणि ‘गुरुजी’ ही आधीची संबोधनं आता क्वचितच ऐकू येतात. ती पुन्हाही वापरता येतील. काही ठिकाणी शाळेतल्या शिक्षकांना ‘ताई’, ‘दादा’ असंही संबोधलं जातं, त्याचंही अनुकरण करता येईल. इतर काही सामाजिक संपर्कातही एकमेकांना ‘ताई’, ‘दादा’ असे संबोधलं जातं, पण वेगळा पर्याय हवा असेल तर ‘महोदय’ आणि ‘महोदया’ असंही संबोधता येईल. कार्यालय किंवा इतर औपचारिक संपर्कात ‘महोदय’, ‘महोदया’ हे शब्द लेखी वापरात आहेत, पण तिथल्या बोलण्यातही ते अजून मोठय़ा प्रमाणात वापरता येऊ शकतील. आदरार्थी उल्लेख करण्यासाठी ‘श्रीमान’, ‘श्रीमती’ हे शब्द तसंच पुरुषांच्या नावानंतर लावण्यात येणारं ‘राव’ हे एक संबोधन पुन्हा लक्षात घेता येईल. शेवटी कोणत्याही शब्दाला तो कोणत्या हेतूने आणि संदर्भात वापरला आहे त्यातून अर्थ लाभतो.
‘मॅडम’ आणि ‘सर’ हे शब्द अनेक क्षेत्रांमध्ये वापरल्याने रुळले. पण सरधोपटपणे त्यांचा वापर करून त्यांना काही पर्यायच नाही असं न समजता, संदर्भानुसार वेगवेगळे पर्याय नक्की सुचवले पाहिजेत आणि वापरले पाहिजेत असं वाटतं.
तुम्हाला काय वाटतं?
– वैशाली पेंडसे-कार्लेकर
vaishali.karlekar1@gmail.com