काही शब्दांची किंवा शब्दप्रयोगांची व्युत्पत्ती शोधताना ते अनवधानाने केलेल्या चुकीच्या उच्चारांमुळे रूढ झाल्याचे जाणवते. उदाहरणार्थ, ‘पुराणातली वांगी’ हा शब्दप्रयोग. आपले म्हणणे मांडताना, त्याच्या पुष्टय़र्थ काही जण उगाचच कुठल्या तरी जुन्या ग्रंथांतील संदर्भ देऊ लागतात. अशा वेळी ‘अहो, ती पुराणातली वांगी पुराणात राहू द्या, आजच्या संदर्भात बोला’ असे त्यांना सुनावले जाते. पण हा शब्दप्रयोग आला कुठून? वांगी ही एक अस्सल भारतीय भाजी. संस्कृतात तिला वंगन: म्हटले आहे व त्यावरूनच बैंगन हे नाव ‘व’चा ‘ब’ होऊन अन्य भारतीय भाषांत गेले असावे. पण कुठल्याही पुराणात वांगी हा प्रकार नोंदलेला नाही! मग ‘पुराणातली वांगी’ हा काय प्रकार आहे? मुळात तो शब्द ‘वांगी’ नसून ‘वानगी’ म्हणजेच ‘उदाहरण’ असा आहे. पण उच्चार करताना ‘वानगी’ शब्दाचा ‘वांगी’ हा चुकीचा उच्चार रूढ झाला आणि ‘पुराणातली वांगी’ हा विचित्र शब्दप्रयोग जन्मास आला! ऐतिहासिक कारणांतून अनेक शब्दप्रयोग भाषेत आले. उदाहरणार्थ, ‘लष्करच्या भाकऱ्या भाजणे’. पूर्वी राजांची फौज मुलुखगिरी करत बाहेर पडायची, तेव्हा वाटेत त्या फौजेचा मुक्काम वेगवेगळय़ा गावांत होत असे. त्यांच्या जेवणाची सोय कोण करणार? मग ते सैनिक आसपासच्या गावांतील स्त्रियांना पकडून आणत व जबरदस्तीने स्वत:साठी भाकऱ्या भाजायच्या कामाला जुंपत. अर्थातच त्या स्त्रियांना या कामाचा काहीच मोबदला दिला जात नसे. सैनिकांकडे पैसे मागायचे धाडस कोण करणार! अर्थात आजही लोकांकडून फुकटात वस्तू आणि सेवा उकळणारे अधिकारी असतातच! त्यावरून ‘कुठलाही मोबदला न मिळता करावे लागणारे कष्ट’ या अर्थाने ‘लष्करच्या भाकऱ्या भाजणे’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. हे जबरदस्तीने आणि लाचारीने करावयाचे काम असे. पण या शब्दप्रयोगाला एक चांगला अर्थही काळाच्या ओघात प्राप्त झाला. सामाजिक कार्यकर्ते जेव्हा स्वत:चा काहीही स्वार्थ नसताना, आपल्या कामधंद्याकडे दुर्लक्ष करूनही, केवळ समाजाच्या हितासाठी म्हणून कष्ट उपसतात तेव्हा त्यालाही ‘लष्करच्या भाकऱ्या भाजणे’ म्हटले जाते. पण त्या वेळी मात्र हा शब्दप्रयोग कौतुकदर्शक असतो.

– भानू काळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

bhanukale@gmail.com