काही शब्दांची व्युत्पत्ती धार्मिक परंपरांशी जोडलेली असते; पण काळाच्या ओघात त्यांच्यात बराच अर्थबदल झालेला असतो. खांदेपालट आणि गंगाजळी हे असेच दोन शब्द. दोन्ही शब्दांचा संबंध मृत्यूशी जोडलेला आहे, हा एक योगायोग. खांदेपालट शब्दाचा संबंध अंत्ययात्रेशी आहे. हल्ली बहुतेकदा रुग्णवाहिकेतून किंवा शववाहिकेतून मृतदेह स्मशानभूमीवर नेला जातो; पण तरीही मृतदेह तिरडीवर ठेवलेला असतो आणि तिरडीच्या चारही बाजूंना असलेले बांबू आपापल्या खांद्यावर घेऊन नातेवाईक काही पाऊले चालतात. पूर्वी स्मशानभूमी गावाबाहेर असे आणि अशा वेळी दीर्घकाळ तिरडी खांद्यावर घेऊन थकलेले नातेवाईक बाजूला होत आणि त्यांची जागा अन्य नातेवाईक घेत. हा खरा खांदेपालट शब्दाचा अर्थ. आज आपण हा शब्द ‘रिशफल’ या इंग्रजी शब्दाला समानार्थी वापरतो. एखाद्या व्यक्तीकडे असलेली विशिष्ट जबाबदारी त्याच्याकडून काढून घेऊन ती दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवणे याला सामान्यत: खांदेपालट असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, मंत्रिमंडळात, प्रशासनात किंवा एखाद्या आस्थापनेत जेव्हा खात्यांची अदलाबदल केली जाते, तेव्हा त्या बदलाचा उल्लेख खांदेपालट असा केला जातो. ‘गंगाजळी’ हा असाच एक धार्मिक परंपरेशी निगडित पण आज वेगळय़ा अर्थाने वापरला जाणारा शब्द. गंगा नदी पवित्र मानली जाते; तिच्यात डुबकी घेतली की पापे धुतली जातात; गंगाजल प्राशन केले की पुण्य मिळते ही बहुमान्य श्रद्धा. तिचे घोटभर पाणी मरणोन्मुख व्यक्तीला अगदी अखेरच्या क्षणी पाजायचे ही त्याच श्रद्धेतून आलेली एक जुनी  परंपरा. म्हणून अनेक घरांमध्ये गंगेचे पाणी एखाद्या बाटलीत, गडूत किंवा कुपीत जपून ठेवलेले असे. आज ही परंपरा मागे पडत आहे आणि त्याऐवजी गंगाजळी हा तद्भव शब्द राखीव निधी म्हणजेच ‘रिझव्‍‌र्ह्ज’ या शब्दाला समानार्थी म्हणून रूढ झाला आहे. कंपनीच्या किंवा संस्थांच्या ‘बॅलन्स शीट’मध्ये असा निधी दर्शवलेला असतो आणि अडचणीच्या  वेळी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा वापर करता येतो. सरकारकडेही असा धनसंचय असतो; विदेशी चलनाचीही गंगाजळी असते. गंगाजळी शब्द जमवलेल्या माहितीच्या संदर्भातही वापरला जातो. असे शब्द भाषा समृद्ध करणारे धार्मिकतेचे एक आगळे अंग ठरतात.

– भानू काळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

bhanukale@gmail.com