गर्भवती वराह- माद्यांमध्ये लेप्टोस्पायरोसिस हा रोग लेप्टोस्पायरा पोमोना या जीवाणूंमुळे होतो. वराहांमध्ये गर्भपात होतो किंवा अशक्त  पिल्ले आधीच जन्मतात. हा संसर्गजन्य आजार असून जिवाणू लघवीवाटे बाहेर पडतात. दुसऱ्या जनावरांच्या नाक आणि डोळ्यांवाटे शरीरात प्रवेश करतात. या रोगांचा फैलाव संभोगातून होतो.
घटसर्प रोग पाच्चुरेल्ला जिवाणूंमुळे होतो. वराहांमध्ये खाकसणे, िशका येणे, ताप येणे, नाक गळणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. पिग न्यूमोनिया रोगामुळे वराहाला खोकला व श्वासोच्छ्वास त्रास होतो. शेतावर गर्दी वाढल्यास रोगाचे प्रमाण वाढते.
जिवाणूंमुळे गळू हा रोग झाल्यास जबडय़ाखाली, मानेवर वा शरीरात कोठेही पू(पस) भरलेले गळू दिसतात. इरिसिपिलस जिवाणूंमुळे होणाऱ्या आजारात वराहांना ताप येतो, हाडांमध्ये सूज येते, चामडीवर लाल डाग दिसतात.
 देवी या विषाणूजन्य रोगात वराहाचे पोट, कान, मान, पायामागील भाग, पाठ येथे व्रण दिसतात. ते कायम राहातात. कॉलरा रोगात मरतुकीचे प्रमाण खूपच जास्त असते. वराहात ताप, उलटय़ा, पातळ विष्ठा, रक्ती हगवण अशी लक्षणे दिसतात.
 इन्फ्लुएंझा या विषाणूजन्य रोगात वराहाचे तापमान १०७ अंश फॅरनहाइटपर्यंत वाढते. वराहाचे खाणे-पिणे कमी होते. श्वासोच्छ्वास त्रास होतो. नाक, तोंड व गळ्यातून द्रव गळतो. चालताना त्रास होतो. ते चक्कर येऊन पडतात. लाळ्याखुरकत रोगात जिभेवर, जबडय़ात, नाकपुडीजवळ व खुरांवर फोड येतात. वराह खाद्य खात नाहीत. त्यांची लाळ गळते. त्यांना चालताना त्रास होतो.
अ‍ॅनिमिया आजाराचे प्रमाण नवजात पिल्लांमध्ये अधिक आढळते. पिल्ले खाद्य कमी खातात, अशक्त होतात, शरीरावर सूज येते, श्वासोच्छ्वास त्रास होतो. माद्यांच्या खाद्यात लोह टाकल्याने व नवजात पिल्लांना लोहाचे इंजेक्शन दिल्याने रोगास प्रतिबंध होतो.
खाद्यातील आवश्यक घटकांची कमतरता, खाद्यातील बदल, जास्त खाद्य खाणे, विषाणू-जिवाणूंचा प्रादुर्भाव, कृमी इत्यांदींमुळे वराहामध्ये हगवण होते. पिल्लांमध्ये हगवणीने मरतुकीचे प्रमाण अधिक असते.
घरांची स्वच्छता, संतुलित आहार व योग्य वेळी लसीकरण केल्यास वराहांमधील बहुतेक आजारांना प्रतिबंध करता येतो.
– डॉ. शरद आव्हाड (नगर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..  – पाश्चिमात्य देशांमधला चार्वाक – रिचर्ड डॉकिन्स
रिचर्ड डॉकिन्स नावाच्या माणसाने हल्ली पाश्चिमात्य देशांत बुद्धिवादी धुमाकूळ माजवला आहे. यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माविरुद्ध याने सुरू केलेल्या वाग्युद्धाने तिथले धार्मिक विश्व पार ढवळून निघाले आहे. पाश्चिमात्य देशांतल्या सुखलोलुपतेने आधीच मंडळी धर्माच्या बाबतीत सुस्त झाली होती. विज्ञानाच्या असंख्य झेपांमुळे जे चमत्कार घडत आहेत, त्यामुळे नैसर्गिक म्हणजे दैवी चमत्कारावरचा विश्वास हळूहळू उडू लागला आहे. धर्माचे रक्षण घरीदारी करण्याची जबाबदारी सोपवलेल्या स्त्रिया शिक्षणाच्या प्रसारामुळे आता स्वतंत्रपणे प्रश्न विचारू लागल्या आहेत. त्यातच या डॉकिन्सने असा प्रश्न विचारला की, बहुसंख्य लोक देवावर विश्वास ठेवतात एवढय़ा एका बळावर तुम्ही देव अस्तित्वात आहे असे कसे म्हणू शकता? तो पुढे म्हणतो, अमेरिकेत आणि अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या दोन माणसांचे दोन निरनिराळे देव कसे? इसवी सन १००० ते १५०० मध्ये झालेल्या ख्रिश्चन लोकांच्या मुसलमानांवर झालेल्या अनेक स्वाऱ्यांमुळे लाखोकरोडो मेले. स्वत: ख्रिश्चन लोक क्षीण झाले. मुसलमानांचा त्यांच्यावर कायमच डूक राहिला आहे आणि या सगळ्या भानगडीत रोमन लोकांचे साम्राज्य आणि संस्कृती लयाला गेली, असे सांगून डॉकिन्स म्हणतो, कल्पना करा, ज्याचा मूळ पाया देवच आहे तो धर्म नसता तर केवळ ज्यू म्हणून लाखोंनी निरपराध माणसांना यमसदनाला पाठवण्याचे क्रूर कर्म घडले असते का? भारताच्या फाळणीत झालेल्या अनन्वित हालाचेही उदाहरण तो देतो आणि विचारतो, काही लोक असा दावा करतात की, मध्यपूर्वेतले तिन्ही धर्म शास्त्रशुद्ध विचारावर आधारित आहेत, मग शास्त्रीय दृष्टिकोणातून देव नावाच्या कल्पनेवर जर चर्चासत्र योजिले तर मग देवाच्या बाजूचे हरू लागले की रडीचा डाव खेळत. हा प्रश्न श्रद्धेच्या प्रांतातला आहे, असे म्हणून का पळवाटा काढतात? निरनिराळ्या प्रकारचे कपडे घालून, भक्तगण जमवून, देवाचा मक्ता आपलाच असे भासवून भाबडय़ा माणसांना फसवणे, त्यांना जादूटोणा केल्यासारखे तेच तेच सांगून डोके बंद करण्यास भाग पाडणे आणि मग बक्कळ पैसे मिळवून पडद्याआड मौजमजा करणे हे जगाच्या पाठीवर सतत घडले आहे. याची अनेक पाश्चिमात्य देशांतली उदाहरणे त्याने दिली आहेत. महम्मद पैगंबराची मध्ये कार्टून्स काढण्यात आली त्यावर मोठे थैमान माजले. ते ज्यांनी माजवले त्यांनी न काढलेली तीन कार्टून्स त्यात घुसडली आणि मुद्दामच रान माजवले आणि त्या भानगडीत काहीही संबंध नसलेल्या निरपराध लोकांचे प्राण गेले याचे दाखले त्याने दिले आहेत. पाश्चिमात्यांचे अनुकरण कळत नकळत आपण करतच आहोत. तेव्हा दुरून का होईना सावधपणे दुसऱ्यांबद्दल(!) लिहिणे सोयीस्कर. या विचारान्ती डॉकिन्स पुराणावर लिहिणार आहे. सोमवारी त्याचे आणखी काही मुद्दे.
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boars diseases
First published on: 12-10-2013 at 01:02 IST