डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहान मुलं अनुकरणप्रिय असतात, हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे. घरातली माणसं पुस्तकं वाचत असतील तर मुलंही पुस्तकं वाचायला शिकतात. ती माणसं मोबाइलवर वेळ घालवत असतील तर मुलंही मोबाइलसाठी हट्ट करतात, वगैरे.

कधी कधी कुटुंबावर वाईट परिस्थिती ओढवते. उदाहरणार्थ, कोणाचा मृत्यू, कर्ज, जवळच्या माणसाने केलेली फसवणूक, आर्थिक ताणतणाव, मुलांचे किंवा मोठय़ांचे आजार.  अशा परिस्थितीत घर प्रसन्न असणं अवघड असतं.  माणसांना खूपच ताण येतो. पूर्ण वातावरणात कळा पसरते. या वातावरणाशी जुळवून घेता आलं नाही की माणसं एकमेकांवर चिडचिड करतात. नकारात्मक रसायनांच्यामुळे राग दुसऱ्यांवर निघतो. निघतच राहतो.

वातावरणाचा एकमेकांवर नकारात्मक  परिणाम होत राहतो. तर घरातल्या लहान मुलांवर किती होईल?  माणसं जे शब्द बोलत नसतात, ते त्यांचा चेहरा बोलत असतो. मुलं हा चेहरा वाचत असतात. त्यातून शिकत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या परीने, त्यांच्या सीमित अनुभवकक्षांमधून प्रसंगांचा अर्थ लावत असतात. तणावपूर्व, खचलेले, निराशाच्या गत्रेत गेलेले, कावलेले, चिडचिडलेले, उग्र, कठोर, एकाकी असे चेहरे बघून ते अर्थ काढतात.

त्यांनी काढलेले अर्थ हे कदाचित घडलेल्या घटनांपेक्षा गंभीर असू शकतात. या सर्वावरचा त्यांचा निष्कर्ष असा असू शकतो की आपलंच काहीतरी चुकतं आहे, म्हणूनच आईबाबा नाराज आहेत. म्हणून मुलं कितीही लहान असतील – एक वर्षांच्या पुढे –  तरी त्यांच्याशी बोलून त्यांना समजेल अशा भाषेत समस्या सांगायला हव्यात. आईबाबांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मुलांना आधार वाटतो, सुरक्षितता वाटते.

चेहऱ्यावर भाव कसे हवेत, हेदेखील मेंदूच ठरवतो. कारण चेहऱ्याच्या स्नायूंनी कसं, किती व्यक्त व्हायचं आहे हे मेंदूतली कॉर्टसिॉलसारखी ताणकारक रसायनं काबूत आणून योग्य दिशेने विचार करायला लागलो की मेंदूतली परिस्थिती बदलते.  राल्फ अ‍ॅडॉल्फ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संशोधनातून असं दिसलं आहे की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या भावभावना ओळखणं आणि समजून घेणं यासाठी अमिग्डालातले न्युरॉन्स कारणीभूत असतात. चेहऱ्याकडे बघून ते विद्युत संदेश तयार करण्याचं काम ते करतात. अ‍ॅडॉल्फ यांच्या मते, यात न्युरॉन्सचे दोन समूह काम करतात.  हा सर्व अभ्यास ‘सामाजिक आकलन’ या विषयासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain and ideal faces zws
First published on: 18-07-2019 at 04:27 IST