आधुनिक आवर्तसारणीतील चौथ्या आवर्तनातील सतराव्या श्रेणीत ३५ अणूक्रमांक असलेले ब्रोमिन हे गडद नारिंगी वा तपकिरी रंगाचे मूलद्रव्य. साधारण तापमानात हे मूलद्रव्य द्रव स्वरूपात असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८२५ मध्ये हिडेल बर्ग येथे राहणाऱ्या कार्ल लोविग नावाच्या रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांला कारंज्यातून उडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करताना नारिंगी रंगाचा द्रवपदार्थ आढळून आला. त्याने उत्सुकतेने त्याचे शिक्षक लिओपाल्ड मेलीन यांना तो दाखवला. त्यांची खात्री पटली की, क्लोरिनसारखा वास असलेला हा द्रवपदार्थ म्हणजे सामान्य रासायनिक पदार्थ नसून काही तरी वेगळेच आहे. त्याचे सर्व गुणधर्म तपासण्यासाठी त्यांनी कार्ल लोविगला अजून द्रवपदार्थ गोळा करून आणण्यास सांगितले. मात्र हिवाळी परीक्षा व त्यानंतरची सुट्टी यामुळे कार्ल लोविगला तसे करण्यास विलंब झाला.

याच अवधीत मॉटपिलर (फ्रान्स) येथे अँटोनी जेरोम बलार्ड यांना असे आढळून आले की, समुद्राच्या पाण्यातून सोडिअम क्लोराइड व सोडिअम सल्फेट यांसारखे क्षार वेगळे केल्यानंतरही त्यामध्ये अजून काही तरी शिल्लक आहे. रासायनिक प्रक्रियेनंतर बलार्डने नारिंगी रंगाचा द्रव शोधला व या मूलद्रव्याला म्युराइड हे नाव दिले. मात्र त्याच्या उग्र दर्पास ग्रीक भाषेतील ब्रोमोस (दरुगधी) यावरून ब्रोमिन हे नाव कायम करण्यात आले, आणि ब्रोमिनच्या शोधाचा जनक म्हणून बलार्ड यांचे नाव प्रसिद्ध झाले.

मुख्यत: ब्रोमिन हे समुद्राच्या पाण्यात आढळते. त्याचे प्रमाण ६५ पीपीएम (प्रतिदशलक्ष) इतके असते आणि खोलवर मात्र ते वाढत जाते.

ब्रोमिन हे पूर्वीपासूनच उपयुक्त मूलद्रव्य आहे. पूर्वी छायाचित्रणाच्या फिल्म बनवण्यासाठी सिल्व्हर ब्रोमाइड वापरले जायचे. ज्या वेळी शिसेयुक्त पेट्रोल इंधन म्हणून वापरले जायचे त्या वेळी डायब्रोमो इथेन पेट्रोलमधील शिसे काढण्यासाठी वापरले जात असे.

तरणतलावातील जलशुद्धीकरणासाठी क्लोरिनला पर्याय म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून ब्रोमिनची संयुगे खूप प्रभावशाली आहेत. अग्निप्रतिबंधक म्हणूनसुद्धा ब्रोमिनची संयुगे वापरली जातात. वेदनाशामक, न्यूमोनिया तसेच निद्रानाशक औषधांमध्येसुद्धा ब्रोमिनची संयुगे वापरली जात असत. अगदी हल्लीच अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार बॅटरीमध्ये ब्रोमिनच्या संयुगाची चाचणी घेण्यात येत असून त्याचा उपयोग विद्युत संचयन उपकरण म्हणून होऊ शकतो.

– डॉ. सुधीर कृष्णा लिंगायत

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bromine
First published on: 04-06-2018 at 00:22 IST