वर्षभर मराठी विज्ञान परिषदेकडे आलेल्या प्रतिक्रियांचे स्वरूप तरी काय होते, याचे ‘कुतूहल’ वाचकांना असणे स्वाभाविक आहे, म्हणून काही उदाहरणे देत आहे. यातील सर्वच प्रतिक्रियांना उत्तरे त्या त्या व्यक्तींना ई-मेलच्या माध्यमातून दिली आहेत. त्यांपैकी काही प्रतिक्रिया अशा :

लेखातील काही मराठी शब्द समजत नसल्याने मराठी शब्दाबरोबर इंग्रजी शब्दही द्यावेत (सुशील वानखेडे). पाणथळ, तृण, पठार या पर्यावरणीय परिसंस्था माहीत होत्या, पण त्याबाबत फारसे लक्ष नव्हते. ते पर्यावरणीय परिसंस्थांच्या संदर्भातील लेखामुळे प्रकर्षांने लक्षात आले (किरण देशपांडे). सांडपाणी ही समस्या राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात यावी, तरच सामान्य माणूस आणि सरकारला जाग येईल. परिषदेने याचिका दाखल करून, सांडपाणी समुद्र आणि खाडीमध्ये सोडणे थांबविण्यास प्रयत्न केले पाहिजेत (नयन जावडे). ‘सहावा वस्तुमान लोप’ या लेखातील एक गोष्ट खटकली. ‘मास एक्स्टिंक्शन’ म्हणजे ‘वस्तुमान लोप’? (सुनील गोखले). प्राण्यांवरील लेखामुळे अनेक गैरसमज दूर होतील. प्राण्यांविषयी वैज्ञानिक लेख मला पाठवले तर ते मित्रवर्तुळात पाठवून जनजागृती करता येईल (अ‍ॅड. बसवराज होसगौडर). आपले सदर केवळ लहानांसाठीच नाही तर मोठय़ांसाठीही खूप माहितीपूर्ण आहे (वरुण पाटील). हरितगृह परिणामाबद्दल दिलेली माहिती बरोबर नाही. बंदिस्त हरितगृहाच्या आत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते हे निरीक्षण बरोबर असले, तरी त्याचा हरितगृह परिणामाशी संबंध नाही. तसे असते तर उन्हात उभ्या केलेल्या गाडीत, श्वसन करून कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणाऱ्या वनस्पती किंवा प्राणी आत नसतानाही, गाडी आतून तापली नसती (प्रियदर्शिनी कर्वे). आम्ही हिंगोली नगरपंचायतीत तुमचे जैवविविधतेवरचे लेख वाचतो. आम्हाला अधिक माहिती पाठवा (मुख्य कार्यकारी अधिकारी). ठाणे येथे फुलपाखरू उद्यान उभारल्याचे पूर्वी वाचले होते. ते कोठे आहे हे सांगू शकाल का? तसेच त्याची दर्शन वेळ कोणती आहे? (मिलिंद कर्णिक). पाणी टंचाई दूर करण्यासाठी इथून पुढे इमारतींच्या पायात पाण्याची टाकी बांधली तर त्यामुळे इमारतीला काही धोका पोहोचेल का? (अरुण जोगळेकर). ‘प्रयास’ संस्थेतर्फे आम्ही यवतमाळला दहा हजार झाडे लावली आहेत. जवळच शहराचे सांडपाणी जमा केले जाते, त्याचा उपयोग आम्ही झाडांसाठी कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करावे (निखिल परोपटे).

यंदा सदरासाठी निवडलेले ‘पर्यावरण’ हे संकल्पसूत्र वाचकांचे ‘कुतूहल’ जागविणारे ठरले, हे अशा प्रतिसादांवरून दिसते. पर्यावरणाचा वेध घेणाऱ्या या २०२० सालच्या ‘कुतूहल’ सदराचा निरोप घेताना, ‘मराठी विज्ञान परिषदे’तर्फे नव्या वर्षांच्या शुभेच्छा!

– अ. पां. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org