भारतातील ब्रिटिश राजवटीचे पहिले व्हाइसरॉय चार्ल्स कॅनिंग यांची पत्नी म्हणजे व्हाइसराईन अशी प्राथमिक ओळख असलेल्या शार्लोट कॅनिंगची एक वनस्पतीशास्त्रज्ञ आणि जलरंगांची निपुण चित्रकार अशी निराळी स्वतंत्र ओळख आहे. पॅरिस येथे १८१७ साली जन्मलेल्या शार्लोटचे आईवडील ब्रिटिश राजघराण्यातले. वडील चार्ल्स स्टुअर्ट हे ब्रिटनचे फ्रान्समधील राजदूत. त्यामुळे शार्लोटचे बालपण आणि शिक्षण पॅरिसमध्ये झाले आणि फ्रेंच भाषाही तिला उत्तम येत असे. वडिलांची नियुक्ती परत लंडन येथे झाल्यावर ती लंडनमध्ये राहण्यास गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे तिचे लग्न चार्ल्स कॅनिंग या तरुणाशी झाले. चार्ल्स कॅनिंग यांची नियुक्ती १८५६ मध्ये ब्रिटिश भारताचे व्हाइसरॉय म्हणून झाली. शार्लोट भारतात कलकत्त्यात आली ती ‘व्हाइसराईन’ म्हणून! कलकत्त्याच्या भव्य गव्हर्मेट हाऊसमध्ये शार्लोट आणि पती चार्ल्स हे राहावयास आले आणि लंडनमध्ये नेहमी माणसांमध्ये वावर असणाऱ्या शार्लोटचे जीवन एकलकोंडे, कंटाळवाणे झाले. गव्हर्नर जनरलची पत्नी म्हणून तिच्या संपर्कात येणारे लोक तिची मर्जी राखण्यासाठी तिचा जो मानमरातब ठेवत त्यामुळे त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने तिला वागता येत नसे. पुढे कॅनिंग कुटुंब अधूनमधून कलकत्त्याजवळ बराकपूर या ठिकाणी गर्द जंगलाने वेढलेल्या विश्रामगृहात राहावयास जाई. मूळची चित्रकार आणि वनस्पतीशास्त्राची जाणकार असलेल्या शार्लोटला तिथल्या निसर्गाने अशी काही भुरळ घातली की, ती तिथेच राहून जलरंगात निसर्गचित्रे काढण्यात रममाण झाली. तिने पुढे भारताच्या अनेक प्रांतांमध्ये आणि विशेषत: हिमाचल प्रदेशात भ्रमंती करून फुलझाडांचे नमुने गोळा केले, निसर्गचित्रे काढली. तिने जलरंगांमध्ये काढलेल्या चित्रांचे १९ संग्रह प्रसिद्ध आहेत. तिने काढलेली ३५० चित्रे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अलबर्ट म्युझियममध्ये एका खास दालनात ठेवली आहेत. ती फोटोग्राफीसुद्धा करीत असे. तिच्या एका वाढदिवशी कलकत्त्यातले हलवाई भीमचंद्र नाग यांनी खास मिठाई बनवली. ही मिठाई शार्लोटला इतकी आवडली की अनेकवेळा भीमचंद्रांकडे तिची मोठी मागणी असे, पुढे या मिठाईचे नाव ‘लेडीकॅनी’ झाले! लेडी शार्लोट कॅनिंग मलेरियाच्या आजाराने १८६१ मध्ये कलकत्ता येथे मृत्यू पावल्या.

सुनीत पोतनीस –sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charlotte canning
First published on: 09-10-2018 at 01:38 IST